दहा रुपयांची थाळी विसरा, मोफतच जेवून जा; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 08:49 AM2019-12-25T08:49:51+5:302019-12-25T08:50:43+5:30
दिल्ली महापालिकेच्या नजफगड झोनचे उपायुक्त संयज सहाय यांनी ही योजना सुरू केली आहे.
नवी दिल्ली : तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशासारख्या राज्यांनी अवघ्या 5 ते 10 रुपयांत जेवण, नाश्ता अशा योजना लोकप्रिय झाल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातही निवडणुकीवेळी शिवसेनेने 10 रुपयांत पोटभर जेवण, तर भाजपाने ५ रुपयांत पोटभर जेवण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दिल्लीत जेवण मोफत दिले जाणार आहे. यासाठी एकच अट ठेवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे हे जेवण, नाष्टा कुठे साध्या किंवा गलिच्छ ठिकाणी नाही तर मोठमोठ्या मॉलमध्ये मिळणार आहे.
दिल्ली महापालिकेच्या नजफगड झोनचे उपायुक्त संयज सहाय यांनी ही योजना सुरू केली आहे. त्यांनी सांगितले की, द्वारकेच्या दोन मॉलमध्ये गारबेज कॅफे सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये 250 ग्रॅम प्लॅस्टिक घेऊन येणाऱ्यांना नाश्ता तर 1 किलो प्लॅस्टिक घेऊन येणाऱ्या व्यक्तीला दुपारी किंवा रात्रीचे जेवण मोफत दिले जाणार आहे. मंगळवारपासून हे कॅफे सुरू करण्यात आले आहेत.
दिल्लीला पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त करायचे आहे. मात्र, हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा लोक पुढे येतील. यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. यामुळे आम्ही पालिकेच्यावतीने हे अनोखे कॅफे सुरू केले आहेत. वर्धमान प्लस सिटी मॉल आणि सिटी सेंटर मॉलमध्ये दोन कॅफे खोलले आहेत. हे दोन्ही कॅफे मॉलच्या मालकांच्या मदतीने उघडण्यात आले आहेत.
रोज जेवढे प्लॅस्टिक गोळा होईल, त्यावर दिल्ली पालिका प्रकल्पांमध्ये प्रक्रीया करणार आहे. पालिकेच्या अन्य झोनमध्येही अशाप्रकारचे कॅफे उघडले जाणार आहेत. मात्र, त्या ठिकाणी लोकांना मोफत जेवण नाही तर त्यांना प्लॅस्टिक कचरा दिल्यावर कुपन दिले जाणार आहे. या कुपनावर ते अन्य कोणत्याही हॉटेलांमध्ये जेवण करू शकणार आहे. यावर त्यांना 20 टक्क्यांची सूट दिली जाणार आहे.