मतभेद विसरून भाजपसाठी संघ आता मैदानात; लोकसभेत तीन राज्यांत बसला होता फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 06:01 AM2024-08-13T06:01:13+5:302024-08-13T06:01:54+5:30

RSS चे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये साधणार महाराष्ट्रात समन्वय

Forgetting the differences RSS is now in the field for the BJP as Lok Sabha was hit in three states | मतभेद विसरून भाजपसाठी संघ आता मैदानात; लोकसभेत तीन राज्यांत बसला होता फटका

मतभेद विसरून भाजपसाठी संघ आता मैदानात; लोकसभेत तीन राज्यांत बसला होता फटका

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: चार राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यासाठी भाजपसोबतचे मतभेद विसरून राष्ट्रीय स्वसंसेवक संघाने (आरएसएस) कंबर कसली आहे. महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजपसोबत समन्वय समितीच्या बैठकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेतृत्व सक्रिय सहभागी होत आहे. 

आरएसएसचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये हे महाराष्ट्रात भाजपशी समन्वय साधतील, तर दुसरे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार हरयाणात समन्वयाने काम करत आहेत. ते झारखंड आणि जम्मू-काश्मीरचेही काम पाहत आहेत. अरुण कुमार हे भाजपसोबत राष्ट्रीय स्तरावर समन्वयाचे काम पाहत आहेत; पण विधानसभा निवडणुकीसाठी ते या राज्यांवरही विशेष लक्ष देणार आहेत. 

झारखंडची सत्ता मिळविण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे. आरएसएसने जुलैत रांची येथे राष्ट्रीय बैठक आयोजित केली होती. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. नड्डा तेव्हा म्हणाले होते की, राजकारणात आरएसएसच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्याऐवजी भाजप स्वत:च्या बळावर राजकारण करण्यास सक्षम आहे. त्यावर आरएसएसने भाष्य केले नाही. आरएसएसने स्वतःच्या कार्यकर्त्यांना आणि इतर आघाडीच्या संघटनांना संदेश पाठवला आहे.

लोकसभेत तीन राज्यांत बसला होता फटका

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, हरयाणात भाजपला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही, तसेच झारखंडमध्येही १४ पैकी ८ जागांवरच विजय मिळविता आला, तर आदिवासीबहुल असलेल्या राज्यातील लोकसभेच्या पाचही जागा भाजपने गमावल्या. महाराष्ट्र आणि हरयाणात भाजपची सत्ता आहे. येथे पुन्हा जिंकण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे.

Web Title: Forgetting the differences RSS is now in the field for the BJP as Lok Sabha was hit in three states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.