"अटकेनंतर अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदाचा अधिकार गमावला", आपच्या माजी मंत्र्याची हायकोर्टात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 07:57 AM2024-04-07T07:57:46+5:302024-04-07T07:58:14+5:30
उच्च न्यायालयाच्या खंडपीठात या याचिकेवर सोमवार ८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवतील, असे आपकडून म्हटले जात आहे. तर दुसरीकडे भाजपा नैतिकतेच्या आधारावर अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.
यादरम्यान आपचे माजी आमदार आणि मंत्री संदीप कुमार यांनी आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करत अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा अधिकार गमावल्याचे माजी आमदार संदीप कुमार यांनी याचिकेत म्हटले आहे. संदीप कुमार यांनी शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
याचिकेत म्हटले आहे की, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर त्यांनी (केजरीवाल) दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार गमावला आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठात या याचिकेवर सोमवार ८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, यापूर्वी न्यायालयाने अशाच मागण्या असलेल्या दोन याचिका फेटाळून लावल्या होत्या आणि ही बाब मुख्यमंत्र्यांच्या अधिकारक्षेत्रातील असल्याचे म्हटले होते. यामध्ये न्यायालयीन हस्तक्षेप करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
कोण आहेत संदीप कुमार?
२०१६ मध्ये आक्षेपार्ह सीडी वादानंतर आपने संदीप कुमार यांना निलंबित केले होते. या सीडीच्या वादात ते एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आले होते. त्यावेळी ते महिला व बालविकास मंत्री होते. त्यानंतर २०१९ मध्ये, लोकसभा निवडणुकीत बसपाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत दिल्ली विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले होते. तसेच, संदीप कुमार हे सुलतानपूर माजरा येथून आमदार होते.