आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक; भ्रष्टाचारप्रकरणी CID ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 09:02 AM2023-09-09T09:02:25+5:302023-09-09T09:04:05+5:30

Chandrababu Naidu Arrested: मध्यरात्री ३.३० वाजता सीआयडीचे पथक चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यासाठी पोहोचले. यावेळी तेलगू देसम पक्षाचे नेते आणि पोलिसांमध्ये मोठी वादावादी झाल्याचे सांगितले जात आहे.

former andhra pradesh cm and tdp chief n chandrababu naidu arrested by cid in connection with a corruption case | आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक; भ्रष्टाचारप्रकरणी CID ची कारवाई

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक; भ्रष्टाचारप्रकरणी CID ची कारवाई

googlenewsNext

Chandrababu Naidu Arrested: आंध्र प्रदेशातून मोठी बातमी समोर येत आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे चंद्राबाबू नायडू यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा चंद्राबाबू नायडू यांना अटकेचे समन्स बजावण्यात आले होते. भ्रष्टाचाराप्रकरणी आंध्र प्रदेशच्या सीआयडी विभागाने ही कारवाई केली आहे. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तेलगू देसम पक्षाच्या काही नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्राबाबू नायडू यांची वैद्यकीय तपासणी झाली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी एका दौऱ्यादरम्यान नंद्याल जिल्ह्यातील बनगनपल्ली येथे जाहीर सभेला संबोधित केले होते. जाहीर भाषणानंतर नायडू आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करत होते. शनिवारी पहाटे ३.३० च्या सुमारास चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यासाठी सीआयडीचे पथक तेथे पोहोचले. परंतु पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी वाहनाला घेराव घातला आणि आंध्र प्रदेश सीआयडीला त्यांना अटक करू दिली नाही.

नेते आणि सीआयडी पथकांत मोठा वाद

टीडीपी पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशच्या सीआयडी पथकात मोठी वादावादी झाली. त्यानंतर सकाळी ६ च्या सुमारास चंद्राबाबू नायडू व्हॅनमधून खाली उतरले. त्यांनी पोलिसांशी चर्चा केली. चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेसाठी नोटीस जारी करण्यात आली होती. चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकरणाचा तपशील मागितला, मात्र पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केल्याचे सांगत तपशील देण्यास नकार दिला. चंद्राबाबू नायडू यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि अहवाल देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. चंद्राबाबू नायडू यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे मान्य केले. यानंतर चंद्राबाबू नायडू यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यांना घेऊन जाताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीसमोर मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी त्यांना हटवून चंद्राबाबू नायडू यांना तिथून वैद्यकीय तपासणीसाठी नेले.

नेमके प्रकरण काय?

चंद्राबाबू नायडू यांच्यावर कौशल्य विकास घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात चंद्राबाबू यांचे नाव सामील करण्यात आले आहे. या प्रकरणी चंद्राबाबू नायडू यांनी २५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांना कौशल्य विकास प्रकरणात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने जारी केलेल्या एफआयआर प्रत आणि इतर आदेशांची माहिती पोलिसांनी दिली आहे. चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या वकिलांनी तपास अधिकार्‍यांना प्रथमदर्शनी पुरावे देण्याची विनंती केली. चंद्राबाबू नायडू यांच्या नावाचा एफआयआर अहवालात उल्लेख नसल्याचा दावा करण्यात आला. 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री असलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी  सीआयडी अधिकाऱ्यांना या प्रकरणातील त्यांच्या सहभागाबाबत कोणतीही माहिती न देता त्यांना अटक कशी केली जाऊ शकते? अशी विचारणा केली. मात्र, अटक हा तपास प्रक्रियेचा प्राथमिक टप्पा असून, २४ तासांत रिमांड रिपोर्टमध्ये सर्व तपशील देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Web Title: former andhra pradesh cm and tdp chief n chandrababu naidu arrested by cid in connection with a corruption case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.