माजी अरुणाचल मुख्यमंत्र्यांचा आत्महत्येपूर्वी ६० पानी ‘ बॉम्ब’!

By Admin | Published: February 18, 2017 09:59 PM2017-02-18T21:59:39+5:302017-02-18T22:03:42+5:30

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या नोटमध्ये अनेक काँग्रेस नेत्यांवर कोट्यवधी रुपयांची लांच घेतल्याचा आरोप केला.

Former Arunachal Chief Minister's 60 'bombs' before his suicide! | माजी अरुणाचल मुख्यमंत्र्यांचा आत्महत्येपूर्वी ६० पानी ‘ बॉम्ब’!

माजी अरुणाचल मुख्यमंत्र्यांचा आत्महत्येपूर्वी ६० पानी ‘ बॉम्ब’!

googlenewsNext

चौकशीची मागणी: न्यायाधीश, काँग्रेस नेत्यांवार पैसे खाल्ल्याचा आरोप

नवी दिल्ली, दि. १८ - अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी गेल्या आॅगस्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानात गळफास लावून आत्महत्या करण्यापूर्वी एक ६० पानी सविस्तर टिप्पण लिहून ठेवले होते व त्यात सर्वोच्च न्यायालायच्या आजी-माजी न्यायाधीशांसह अनेक काँग्रेस नेत्यांवर कोट्यवधी रुपयांची लांच घेतल्याचा आरोप केला होता, अशी माहिती आता बाहेर आली आहे.
गेल्या ९ आॅगस्ट रोजी पुल यांनी छताच्या पंख्याला फास घेऊन आत्महत्या केली तेव्हा अरुणालच प्रदेश पोलिसांना पूल यांनी ‘मेरे विचार’ या शीर्षकाने लिहिलेले हे हिंदी टिप्पण पोलिसांना मिळाले होते. या टिप्पणाच्या प्रत्येक पानावर पुल यांची स्वाक्षरी आहे व त्यांनी बहुधा महिनाभराचा वेळ घेऊन ते लिहिल्याचे तारखांवरून स्पष्ट होते.
दिवंगत पुल यांच्या पहिल्या पत्नी दांगविमसाई यांनी या टिप्पणाच्या अनुषंगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी सीबीआय किंवा राष्ट्रीय तपासी यंत्रणा यासारख्या केंद्रीय संस्थेने तपास करण्याची मागणी केली. या टिप्पणात नामोल्लेख केलेल्या प्रत्येक न्यायाधीशाला व राजकीय नेत्याला ‘प्रकाशात’ आणून लांच घेतल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जावी, असे त्या म्हणाल्या.
पुल यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी नोंदविलेल्या फिर्यादीचा राज्य सरकारने योग्यपणे तपास न केल्याने नवा एफआयआर नोंदवून तपास केला जावा, अशीही त्यांनी मागणी केली. सीबीआय तपासाची मागणी न करण्यासाठी विद्यमान राज्य सरकाकडून आपल्याला धमकावले, असाही त्यांनी आरोप केला.

पुल यांचे काही धक्कादायक आरोप

- माजी मुख्यमंत्री नाबाम तुकी यांना दोषी ठरवून सीबीआय तपासाच्या गुवाहाटी उच्च न्यायालायच्या निकालास स्थगिती देण्यासाठी माजी सरन्यायाधीश एच. एल. दत्तु यांना २८ कोटी रुपये देण्यात आले.
- माजी सरन्यायाधीश अल्तमास कबीर यांनी पैसे खाऊन अरुणाचलमधील रेशन घोटाळ्यात कंत्राटदारांच्या बाजूने निकाल दिला.
- आताचे सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहार यांचे नातेवाईक विरेंद्र केहार याने माझ्याकडे ४९ कोटी रुपयांची तर आणखी एक न्यायाधीश दीपक मिश्रा यांचे नातेवाईक आदित्य मिश्रा यांनी ३७ कोटी रुपयांची मागणी केली होती.
- सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या निकालाने मुख्यमंत्रीपद गेले तो निकाल व्हायच्या झाल्यानंतरही निकाल बदलण्यासाठी पैसे मागण्यासाठी काही लोकांनी संपर्क साधला. या केससाठी झालेला सर्व ९० कोटी रुपयांचा खर्च तुकी व खंडू या आजा-माजी मुख्यमंत्र्यांनी केला.
- त्यावेळचे केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अरुणाचल प्रदेशला २०० कोटी रुपयांचे अग्रिम कर्ज मंजूर केल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री दोरजी खंडू यांच्या सांगण्यानुसार ६ कोटी रुपये मुखर्जी यांना नेऊन दिले.
- सन २००८ मध्ये काँग्रेसचे खजिनदार मोतीलाल व्होरा यांना ३७ कोटी रुपये देण्यास खंडू यांनी अपल्याला भाग पाडले.
- अरुणाचलमधील काँग्रेस आमदारांमधील बंडखोरी मिटविण्यासाठी कपिल सिब्बल, कमल नाथ, गुलाम नबी अझाद, सल्मान खुर्शिद व व्ही. नारायणस्वामी या केंद्रीय काँग्रेस नेत्यांनी पैशाची मागणी केली.

(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Former Arunachal Chief Minister's 60 'bombs' before his suicide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.