BCCI च्या माजी अध्यक्षांच्या कंपनीवर ईडीचा छापा; इंडिया सिमेंटच्या 'रेकॉर्ड'ची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 01:52 PM2024-02-01T13:52:09+5:302024-02-01T13:52:55+5:30
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष आहेत.
N Srinivasan Net Worth: तामिळनाडूतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या कंपनीवर छापा टाकला आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष आहेत. इंडिया सिमेंट ही देशातील सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे. महसुलाच्या बाबतीत शेअर बाजारात सूचिबद्ध असलेली ही देशातील नवव्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे.
इंडिया सिमेंटचे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे ७ प्लांट आहेत. विशेष बाब म्हणजे २००८ ते २०१४ पर्यंत इंडिया सिमेंट्सकडे इंडियन प्रीमिअर लीगची (IPL) फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जची थेट मालकी होती. ईडीने मोठी कारवाई करत बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या कंपनीवर छापा टाकला. ईडीच्या चेन्नईतील टीमने इंडिया सिमेंट्सच्या विविध ठिकाणांवर छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीच्या छापेमारीमुळे एन. श्रीनिवासन यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, इंडिया सिमेंटच्या रेकॉर्डची पडताळणी सुरू आहे.
इंडिया सिमेंट्सवर छापा
ईडी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सातत्याने कारवाई करत आहे. राजकारण्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत कारवाई होत आहे. दुसरीकडे, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. जमीन घोटाळ्याच्या आरोपांमुळे हेमंत सोरेन यांना झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता ते ईडीच्या ताब्यात आहेत. याप्रकरणी तपास यंत्रणेने अद्याप त्यांची अधिक चौकशी केलेली नाही.
विरोधकांचे आरोप
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची देखील ईडी चौकशी सुरू आहे. दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. आतापर्यंत तपास यंत्रणेने त्यांना ५ वेळा चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने गुरुवारी पाठवलेल्या समन्समध्ये अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आता यावेळी केजरीवाल चौकशीसाठी हजर होतात की नाही हे पाहण्याजोगे असेल.