भाजपने तिकीट कापले, माजी आमदार ढसाढसा रडले…; शशीरंजन यांनी दिले पक्ष सोडण्याचे संकेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 01:39 PM2024-09-06T13:39:22+5:302024-09-06T13:49:10+5:30
Former BJP MLA Shashi Ranjan Parmar : माजी आमदार शशीरंजन परमार यांचं तिकीट भाजपनं रद्द केलं आहे. त्यांच्या जागी भाजपनं किरण चौधरी यांची मुलगी श्रुती चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.
Haryana Assembly Elections 2024 : भिवानी : हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात ५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपनेही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने अनेक जुन्या नेत्यांची तिकिटे रद्द केली असून, अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. त्यामुळं तिकिट वाटपावरून नाराज भाजपच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम करणं सुरू केलं आहे.
भिवानी जिल्ह्यातील तोशाम विधानसभा मतदारसंघातूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. येथील माजी आमदार शशीरंजन परमार यांचं तिकीट भाजपनं रद्द केलं आहे. त्यांच्या जागी भाजपनं किरण चौधरी यांची मुलगी श्रुती चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर शशीरंजन परमार अतिशय भावूक झाले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शशीरंजन परमार हे रडताना दिसत आहेत.
भाजपाने तिकीट कापल्यानंतर पत्रकारांनी माजी आमदार शशीरंजन परमार यांच्याशी संवाद साधला. यावेळी तिकीट कापल्याने नाराज झालेल्या शशीरंजन परमार यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा रडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते कार्यकर्त्यांना कसं प्रोत्साहन दिलं जाईल, हेही सांगताना ऐकू येत आहे. तसंच, शशी रंजन यांनी आता भाजप सोडण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, माजी आमदार शशीरंजन परमार हे भिवानी आणि तोशाम या विधानसभा जागांवर आपला दावा करत होते.
किरण चौधरी यांच्या मुलीला मिळाले तिकीट
हरियाणातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शशीरंजन यांनी किरण चौधरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शशीरंजन परमार यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत किरण चौधरी यांना ७२,६९९ मतं मिळाली होती, तर भाजपचे शशी रंजन परमार यांना केवळ ५४,६४० मतं मिळाली होती. या निवडणुकीनंतर किरण चौधरी यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले. आता भाजपने किरण चौधरी यांची मुलगी श्रुती चौधरी हिला उमेदवारी दिली आहे. तर आता काँग्रेस आपल्या जागेवर कोणाला उमेदवारी देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.