सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 07:08 AM2020-10-08T07:08:38+5:302020-10-08T07:30:51+5:30

मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळली असून, जीवनास कंटाळून पुढील प्रवासास जात असल्याचे त्यात म्हटले आहे.

Former CBI Director Ashwini Kumar commits suicide | सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

googlenewsNext

सिमला : सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळली असून, जीवनास कंटाळून पुढील प्रवासास जात असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आहे.

अश्विनी कुमार यांच्या मृत्यूबाबत वृत्त कळताच हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक संजय कुंडू, सिमलाचे पोलीस अधीक्षक मोहित चावला व इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकही दाखल झाले. कुंडू यांनी सांगितले की, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली आहे. अश्विनी कुमार हे त्यांच्या खोलीत गेले, आतून दार लावले व नायलॉनच्या दोरीने आत्महत्या केली. या वेळी त्यांचे कुटुंबीय घरातच होते. या घटनेत काही घातपात असण्याची शक्यता कुटुंबीयांना वाटत नाही. गुरुवारी सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे.

एरव्ही अत्यंत कार्यमग्न असलेले अश्विनीकुमार यांना मागील सहा महिन्यांपासून घरातच राहावे लागत असल्याने बदललेल्या जीवनशैलीमुळे नैराश्य येऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरीही पोलीस इतर शक्यता लक्षात घेऊन तपास करीत आहेत.
त्यांच्या एका शेजाऱ्याने सांगितले की, अश्विनी कुमार हे आज सायंकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. घरी परतल्यावर ते घराच्या वरच्या मजल्यावर गेले होते.

अरुषी तलवार खून प्रकरण खूप गाजत असताना २००८ मध्ये ते सीबीआयचे संचालक झाले होते. मार्च २०१३ ते जून २०१४ पर्यंत ते नागालँडचे राज्यपाल होते. २०१३मध्ये काही काळासाठी ते मणिपूरचे राज्यपाल होते. ऑगस्ट २००६ पासून जुलै २००८ या कालावधीत ते हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक होते. २ आॅगस्ट २००८ ते ३० नोव्हेंबर २०१० या कालावधीत ते सीबीआयचे संचालक होते. सध्या ते सिमला येथील खाजगी विद्यापीठाचे कुलगुरू होते. ते १९७३च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. १९८५मध्ये त्यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये (एसपीजी) नेमणूक केली होती. १९८५ ते १९९० पर्यंत त्यांनी विविध पदांवर काम केले. पीएमओमध्ये सहायक संचालक पदावरही त्यांनी काम केले.

 

Web Title: Former CBI Director Ashwini Kumar commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.