‘जननायक’ ‘भारतरत्न’...मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी मारली होती सत्तेला लाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 08:21 AM2024-01-24T08:21:31+5:302024-01-24T08:21:40+5:30
बिहारचे माजी मुख्यमंत्री स्व. कर्पूरी ठाकूर यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर झाला.
मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठीच्या शिफारसींना विरोध झाला म्हणून सत्तेला लाथ मारणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री स्व. कर्पूरी ठाकूर यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर झाला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने ही घाेषणा केली. ‘जननायक’ म्हणून त्यांना ओळखले जात हाेते. कर्पूरी ठाकूर हे २२ डिसेंबर १९७० ते २ जून १९७१ आणि २४ जून १९७७ ते २१ एप्रिल १९७९ या कालावधीत दाेन वेळा बिहारचे मुख्यमंत्री हाेते. त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही हाेती. त्यांचा जन्म समस्तीपूर जिल्ह्यातील पिताैझिया गावात झाला हाेता. ‘छाेडाे भारत’ चळवळीदरम्यान ते २६ महिने तुरुंगात हाेते.
प्रथमच बिगर काॅंग्रेसी सरकार केले स्थापन
शिक्षक असलेले ठाकूर हे १९५२ मध्ये साेशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर सर्वप्रथम बिहार विधानसभेवर ताजपूर मतदारसंघातून
निवडून गेले. त्यांच्या नेतृत्वात १९६७च्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त साेशलिस्ट पार्टी माेठ्या ताकदीने उभी राहिली हाेती. त्यामुळेच बिहारमध्ये प्रथमच बिगर काॅंग्रेसचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी कर्पूरी ठाकूर उपमुख्यमंत्री बनले.
मुख्यमंत्री हाेते, मुलीसाठी टॅक्सीने गेले
कर्पूरी ठाकूर हे गरीब नेते म्हणून ओळखले जायचे. भत्त्यांशिवाय एकही अतिरिक्त रुपया त्यांनी घेतला नाही. त्यांच्या मुलीसाठी मुलगा बघण्यासाठी त्यांना रांची येथे जायचे हाेते. मुख्यमंत्री असूनही त्यांनी सरकारी वाहन न घेता टॅक्सीचा वापर केला.
विमानही उतरु दिले नाही
पत्नीच्या इच्छेखातर मूळ गावी मुलीचा विवाह झाला. विवाहासाठी माेजक्या कुटुंबियांनाच बाेलावले हाेते. एवढेच नव्हे, तर त्या दिवशी दरभंगा आणि सहरसा येथील विमानतळांवर एकही विमान उतरणार नाही, असे त्यांनी आदेश दिले हाेते. जेणेकरुन काेणीही नेता लग्नाला येणार नाही. मुख्यमंत्री गावात असल्याचे पाेलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दाेन दिवसांनी कळाले. ते गावी पाेहाेचले तेव्हा एवढा साधा माणूस मुख्यमंत्री असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला हाेता.
म्हणून बनले ‘जननायक’
कर्पूरी ठाकूर यांनी अनेक आंदाेलने केली. त्यांचा संबंध थेट जनतेशी हाेता. त्यासाठी अनेकदा त्यांना तुरुंगात जावे लागले. मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांना ‘जननायक’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते हिंदी भाषेचे पुरस्कर्ते हाेते. शिक्षण मंत्री असताना त्यांनी इंग्रजी हा अनिवार्य विषय म्हणून दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातून वगळला हाेता. बिहारच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीमुळे नुकसान हाेत असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले, असे त्यावेळी बाेलले गेले.
‘तपस्येचे फळ मिळाले’
कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर पुत्र रामनाथ ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला. बिहारच्या जनतेच्यावतीने आभार मानले. आम्हाला ३६ वर्षांच्या तपस्येचे फळ मिळाले, असे ते म्हणाले.