"गांधींच्या देशाला गोडसेचा देश होऊ देणार नाही", मेहबूबा मुफ्ती यांचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 07:46 PM2023-06-23T19:46:58+5:302023-06-23T19:47:25+5:30
opposition party meeting in patna : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी आज बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक पार पडली.
पाटणा : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी बिहारची राजधानी पाटणा येथून विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला. आज झालेल्या बैठकीत देशातील १५ राजकीय पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी देखील सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करताना 'गांधींचा देश गोडसे'चा होऊ देणार नसल्याचे म्हटले.
मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, आपल्या संविधानावर, धर्मनिरपेक्षतेवर आणि लोकशाहीवर ज्याप्रकारे हल्ले केले जात आहेत, त्याची सुरुवात जम्मू-काश्मीरमधून झाली आणि आता ते संपूर्ण देशभरात घडत आहे. गांधींच्या देशाला गोडसेचा देश होऊ द्यायचा नाही हाच आपला प्रयत्न असेल.
VIDEO | "The way our constitution, secularism and democracy is being attacked, it started in Jammu and Kashmir. And, now it's happening across the country," says former Jammu and Kashmir CM Mehbooba Mufti in joint presser after Patna opposition meeting.#OppositionMeetingpic.twitter.com/w0faor1SWC
— Press Trust of India (@PTI_News) June 23, 2023
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी आज देशातील विरोधी पक्षांची बिहारची राजधानी पाटणा येथे बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅटट्रिक रोखण्यासाठी कॉंग्रेससह देशातील विविध प्रादेशिक पक्षांनी एकजुट दाखवली आहे. आज १५ विरोधी पक्षांनी एकत्र येत बिहारची राजधानी पाटणा येथून रणशिंग फुंकले. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात आली असल्याचे कळते.
विरोधकांनी फुंकले रणशिंग
पाटणा येथे झालेल्या बैठकीनंतर आगामी निवडणुकीत एकत्रितपणे लढण्याचा निर्धार विरोधकांनी केला आहे. दरम्यान, विरोधकांच्या बैठकीला कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सीताराम येचुरी, डी राजा यांसह इतरही काही नेत्यांची उपस्थिती होती.