दिल्लीत गुन्हेगारी नाही अजूनही म्हणाल का? तिघांच्या हत्येनंतर केजरीवालांचा केंद्राला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 12:39 IST2024-12-04T12:33:55+5:302024-12-04T12:39:40+5:30
राजधानी दिल्लीतील तिहेरी हत्याकांडावरुन माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

दिल्लीत गुन्हेगारी नाही अजूनही म्हणाल का? तिघांच्या हत्येनंतर केजरीवालांचा केंद्राला सवाल
Delhi Triple Murder : राष्ट्रीय राजधानीतील नेब सराय भागात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पती पत्नी आणि त्यांच्या मुलीची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये राजेश त्यांची पत्नी कोमल आणि मुलगी कविता यांचा समावेश आहे. मॉर्निंग वॉकवरुन मुलगा घरी परतला तेव्हा तिघांचेही मृतदेह घरात पडलेले दिसले. तिघांचे मृतदेह पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो बेशुद्ध झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दुसरीकडे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
बुधवारी सकाळी तिघांच्या हत्येने दिल्ली हादरली आहे. दक्षिण दिल्लीतील नेब सराय भागातील देवळी येथे पती, पत्नी आणि मुलीच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. राजेश यांचा मुलगा पहाटे ५ वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. घरी आला असता त्याला आई-वडील व बहिणीचे मृतदेह दिसले. तिघांचीही हत्या झाली होती. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता तर राजेश हे सैन्यातून निवृत्त झाले होते.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. याप्रकरणी पोलीस मुलाची चौकशी करत आहेत. हा गुन्हा करण्यासाठी चाकूचा वापर करण्यात आला आहे. तिघांचीही वार करून हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा चोरीचा प्रकार समोर आलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हत्येमागील नेमकी कारणे शोधली जात आहेत.
दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकणावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नेब सराईत एकाच घरात तिघांचा खून. हे खूप वेदनादायक आणि भीतीदायक आहे. रोज सकाळी दिल्लीतील लोक अशा भीतीदायक बातम्यांनी जागे होतात. गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. घरे उद्ध्वस्त होत आहेत, निष्पाप जीव गमावले जात आहेत आणि ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते हे सर्व घडताना मूकपणे पाहत आहेत. केंद्र सरकार गप्प बसून दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था कोलमडताना पाहणार का? दिल्लीत गुन्हेगारी हा मुद्दा नाही, असे त्यांचे पक्ष अजूनही म्हणतील का?, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.