PAK vs AUS सामन्यावरून राजकारण तापलं; विद्यमान मुख्यमंत्र्यांची उपस्थिती अन् 'माजी' संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 08:32 PM2023-10-21T20:32:52+5:302023-10-21T20:33:00+5:30
HD Kumaraswamy On Siddaramaiah : शुक्रवारी बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला गेला.
HD Kumaraswamy On Karnataka Govt : सध्या भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. शुक्रवारी बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळवला गेला. हा सामना पाहण्याठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विविध खात्याच्या मंत्र्यांनी हजेरी लावली होती. यावरून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी सडकून टीका केली आहे. बंगळुरूमध्ये माध्यमांशी बोलताना कुमारस्वामी यांनी सांगितले की, राज्य अडचणीत असताना सरकार मात्र क्रिकेट सामने पाहण्यात व्यग्र आहे.
राज्य सरकारवर टीका करताना कुमारस्वामी म्हणाले, "काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असता तर चालले असते पण सामना पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा होता. त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला की ऑस्ट्रेलियाला? राज्यात जनतेचे हाल होत असून सरकार क्रिकेटचा सामना पाहत आहे."
"राज्य सरकारमधील नेत्यांनी निधीसाठी केंद्राला पत्र लिहून वेळ मागितली पाहिजे. जनतेने आम्हाला सत्ता दिली, असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. पण, सरकारमधील टक्केवारी आणि भ्रष्टाचार यावर लोक बोलत आहेत. काँग्रेसवाले बोलतात की, आम्ही जे बोललो ते केले पण शेतकर्यांचे नुकसान होत आहे त्याचे काय? राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करत आहे का? सरकारने केंद्राशी पत्रव्यवहार केला का? राज्य सरकारने केंद्राशी संपर्क साधायला हवा", असेही कुमारस्वामी यांनी नमूद केले.
कुमारस्वामी यांची राज्य सरकारवर टीका
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी ७ ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, राज्य सरकारने केंद्राकडे पीक नुकसान भरपाईसाठी ४,८६० कोटी रुपयांचे आवाहन केले आहे. मनरेगाची थकबाकीही केंद्राकडे मागितली आहे. यावर कुमारस्वामी म्हणाले की, काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई असून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि काही भागात पिकाच्या गुणवत्तेशी संबंधित समस्या आहेत. सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे.