माजी कोळसा सचिवास दोन वर्षांचा कारावास
By admin | Published: May 22, 2017 04:32 PM2017-05-22T16:32:07+5:302017-05-22T16:32:07+5:30
विशेष न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह तीन सरकारी अधिकाऱ्यांना प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - पूर्वीच्या संपुआ सरकारच्या काळातील कोळसा खाणपट्टे वाटप घोटाळ्याशी संबंधित एका खटल्यात येथील विशेष न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह तीन सरकारी अधिकाऱ्यांना प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
गुप्ता यांच्याखेरीज के. एस. ख्रोपा आणि के. सी. समारिया या दोन सनदी अधिकाऱ्यांना तुरुंगवासाखेरीज प्रत्येकी एक लाख रुपये दंडही ठोठावला. आरोपींना उच्च न्यायालयात अपील करता यावे यासाठी लगेच जामीनही देण्यात आला. ज्या मे. कमल स्पंज स्टील अॅण्ड पॉवर लि. या कंपनीस हा कोळसा खाणपट्टा दिला गेला होता, त्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन कुमार अहलुवालिया यांना तीन वर्षांची कैद आणि 30 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.
कंपनीस एक कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला. न्यायाधीश भारत पराशर यांनी या सर्व आरोपींना शुक्रवारी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा व भारतीय दंड विधानाखालील विविध गुन्ह्यांसाठी दोषी ठरविले होते. कोळसा खाणपट्टे घोटाळ खटल्यातील या पहिल्या शिक्षा आहेत.