"देशाला घराणेशाहीतून बाहेर पडायचंय...", खासदार गंभीरकडून PM मोदींचं तोंडभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 07:40 PM2023-06-14T19:40:08+5:302023-06-14T19:40:49+5:30
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो.
नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. अलीकडेच त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाबद्दल भाष्य केले होते. आता त्याने दिल्लीतील पक्षाच्या 'सर्व समाज संमेलना'त बोलताना विरोधकांना डिवचले. भाजप खासदार गंभीरने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना म्हटले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने नेहमीच सर्वांना समानतेने पाहिले आहे."
तसेच काही लोकांनी आयुष्यभर तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे, तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकारने नेहमीच सर्वांना समानतेने पाहिले आहे. देशाला घराणेशाहीच्या राजकारणातून पुढे जायचे आहे आणि विकास आणि सकारात्मकतेकडे वाटचाल करायची आहे, असे भाजप खासदार गौतम गंभीरने दिल्लीतील पक्षाच्या सर्व समाज संमेलनात सांगितले.
VIDEO | “Some people have done politics of appeasement their whole lives, whereas PM Modi’s government has always viewed everyone equally. The country wants to move on from dynastic politics and move towards development and positivity,” says BJP leader Gautam Gambhir at party's… pic.twitter.com/ghIffTcjvq
— Press Trust of India (@PTI_News) June 14, 2023
WTC फायनलनंतर गंभीर चर्चेत
भारतीय संघ पुन्हा एकदा ICC ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरल्याने सर्व स्तरातून टीम इंडियावर टीका केली जात आहे. २०१३ पासून आतापर्यंत भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पाचव्या आणिअखेरच्या दिवशी भारताचा २०९ धावांनी पराभव केला आणि प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप काबीज केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाला सर्व बाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे. अशातच माजी सलामीवीर गौतम गंभीरने भारतीय संघावर साधताना म्हटले, "मला वाटते की अनेक लोक हे बोलणार नाहीत, पण हे सत्य आहे आणि जगासमोर यायला हवे. आपल्या देशाला संघाची नाही, तर संघातील मोठ्या खेळाडूंची पूजा केली जाते. आम्ही खेळाडूला संघापेक्षा मोठा मानतो. इंग्लंड, न्यूझीलंड आणि इतर देशांमध्ये संघ मोठा आहे, एक खेळाडू नाही. हेच कारण आहे की आम्ही दीर्घकाळ आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो नाही, कारण आम्हाला संघापेक्षा एका खेळाडूचे वेड आहे.''