क्रिकेटपटूने हॉटेलची ५.५३ लाखांची केली फसवणूक; ऋषभ पंतलाही १.६३ कोटींचा लावला चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:03 PM2023-12-27T22:03:38+5:302023-12-27T22:16:11+5:30
हॉटेल ताजने एफआयआर केला होता दाखल
नवी दिल्ली: नवी दिल्लीतील चाणक्यपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी हरियाणातील मृणाक सिंग नावाच्या आरोपीला अटक केली आहे. मृणाक सिंग हरियाणाकडून अंडर-19 क्रिकेट खेळला आहे. त्याने जुलै 2022 मध्ये दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलची 5,53,000 रुपयांची फसवणूक केली होती.
आरोपी मृणाक सिंगने कर्नाटकचा वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून भारतातील अनेक आलिशान हॉटेल्सच्या मालकांची आणि व्यवस्थापकांची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्याच्या फसवणुकीच्या बळींमध्ये टीम इंडियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऋषभ पंतचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ऋषभ पंतची 2020-2021 मध्ये 1.63 कोटी रुपयांची त्याने फसवणूक केली होती.
हॉटेल, बार, रेस्टॉरंट, तरुणी, कॅब चालक, खाद्यपदार्थांची छोटी दुकाने यांसह अनेकांची मृणांक सिंगने फसवणूक केली आहे. मोबाईलच्या प्राथमिक तपासात आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक व्हिडीओ आणि फोटो सापडले असून त्यातील काही अत्यंत आक्षेपार्ह आहेत. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आणखी अनेक पीडितांची नावंही पुढे येण्याची शक्यता आहे.
हॉटेल ताजने एफआयआर केला होता दाखल-
22 ऑगस्ट 2022 रोजी ताज पॅलेस हॉटेल नवी दिल्लीच्या सुरक्षा संचालकांनी चाणक्यपुरी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. क्रिकेटर असल्याचा दावा करणारा मृणांक सिंग 22 जुलै ते 29 जुलै 2022 या कालावधीत हॉटेल ताज पॅलेसमध्ये थांबला होता, असे सांगण्यात आले. हॉटेलचे 5,53,362 रुपयांचे बिल न भरताच त्यांनी हॉटेल सोडले. जेव्हा त्याला पैसे मागितले तेव्हा त्याने सांगितले की त्याची कंपनी Adidas पेमेंट करेल. यानंतर हॉटेलचे बँक डिटेल्स त्यांच्यासोबत शेअर करण्यात आले. त्याने 2 लाख रुपयांच्या ऑनलाइन व्यवहाराचा UTR क्रमांक शेअर केला: SBIN119226420797 तत्काळ हॉटेलच्या यंत्रणेत तपासणी केली असता आरोपीने कोणतेही पैसे भरले नसल्याचे आढळून आले.
लाखो रुपयांची केली फसवणूक-
चौकशीत आरोपीने ADGP कर्नाटक असल्याचे भासवून अनेक लक्झरी रिसॉर्ट्स आणि हॉटेल्सची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. अनेक प्रसंगी आयपीएल क्रिकेटपटूंनी त्यांच्या स्टारडमचा वापर करून त्यांच्यावर प्रभाव टाकला आणि त्यांना अनेक दिवस राहण्यास सांगून खोटी आश्वासने दिली आणि नंतर पैसे न देता निघून गेला. त्याच्या मोबाईल फोनच्या प्राथमिक तपासात त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून फसवणूक केलेली रक्कम लाखोंची आहे.