"कठोर कायद्याची गरज आहे...", वसतिगृहातील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर गांगुलीची तीव्र नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 07:30 PM2023-08-18T19:30:25+5:302023-08-18T19:30:47+5:30
पश्चिम बंगालमधील जादवपूर येथील विद्यापीठ परिसरात झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर वाद चिघळला आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील जादवपूर येथील विद्यापीठ परिसरात झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर वाद चिघळला आहे. जादवपूरच्या घटनेनंतर राज्यातील इतर विद्यापीठे आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. जादवपूरच्या घटनेनंतर रवींद्र भारती, प्रेसिडेन्सी, कलकत्ता या विद्यापीठांनी त्यांच्या कॅम्पसमध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली आहे. आवारात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्यात येत आहे. जादवपूरच्या घटनेनंतर इतर विद्यापीठेही त्यांच्या पूर्वीच्या निर्णयांची फेरतपासणी करत आहेत. अशातच भारतीय संघाचे माजी खेळाडू सौरव गांगुली यांनी या दुर्दैवी घटनेवर नाराजी व्यक्त केली.
ही शिकण्याची ठिकाणे आहेत, या संस्थांमध्ये विद्यार्थी शिकायला येतात. कठोर कायद्याची गरज असून यावरच लक्ष असायला हवे, असे गांगुली यांनी सांगितले. मृत्यूच्या घटनेनंतर चांगलेच राजकारण तापले आहे. सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस सरकारवर आरोप करत भाजपाने सडकून टीका केली.
#WATCH ये पढ़ाई की जगह हैं, इन संस्थानों में छात्र पढ़ने आते हैं। सख्त कानून की जरूरत है...इसी पर मुख्य फोकस होना चाहिए: जादवपुर यूनिवर्सिटी के छात्र की मौत के मामले पर भारतीय क्रिकेट टीम के पूर्व कप्तान सौरव गांगुली pic.twitter.com/Xg2HW8WLtu
— ANI_HindiNews (@AHindinews) August 18, 2023
शुक्रवारी आंदोलन करत असलेल्या भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी सुरू केली असता अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. खरं तर जादवपूर विद्यापीठात ९ ऑगस्ट रोजी वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. विरोधक विविध आरोप करत आहेत. मात्र, ममता सरकार आरोपींचा बचाव करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
दरम्यान, ९ ऑगस्टच्या रात्री स्वप्नदीप हा वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडला असता त्याचा मृत्यू झाला. वसतिगृहात राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना छतावरून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. मग जाऊन पाहिले तर स्वप्नदीप रक्ताच्या थारोळ्यात दिसला. १० ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता स्वप्नदीपचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील पडला तेव्हा त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. तसेच त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा देखील होत्या.