20 गर्लफ्रेंडसचा खर्च उचलण्यासाठी 'डान्स इंडिया डान्स'च्या डान्सरने टाकला दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 03:23 PM2018-01-25T15:23:44+5:302018-01-25T16:10:40+5:30
चित्रपटात काम करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि 20 गर्लफ्रेण्ड्सना खुश ठेवण्यासाठी चोऱ्या केल्याचा खुलासा डान्सरने पोलिसांसमोर केला आहे.
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं दोन दिवसांपूर्वी अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकलेल्या अदनान खान या तरुणास अटक केली. त्यावर गेल्या महिन्यात दिल्लीतील पिझ्झा आऊटलेट दरोड्याचा आरोप आहे. 22 वर्षीय अदनान दिल्लीच्या नामवंत हॉटेलमध्ये प्रसिद्ध डान्सर आहे. पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता त्यानं आपला गुन्हा कबुल केला. पण त्यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली. ती माहिती ऐकून पोलिसही काही वेळ चकित झाले होते.
चित्रपटात काम करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि 20 गर्लफ्रेण्ड्सना खुश ठेवण्यासाठी चोऱ्या केल्याचा धक्कादायक खुलासा अदनान खानने पोलिसांसमोर केला आहे. अदनान हा द्वारकामध्ये डॉमिनोज् पिझा आऊटलेटमध्ये साडेतीन लाखांची लूट करणाऱ्या गँगचा सदस्य आहे.
अदनान खानची संपूर्ण स्टोरी -
अदनाने दहावीतच शाळा सोडली होती. त्यानंतर त्याने नृत्याचे क्लास घ्यायला सुरुवात केली. आपलं कौशल्य दाखवण्यासाठी त्याने यूट्यूब चॅनलही सुरु केलं. त्यानंतर तो डान्स इंडिया डान्स, झलक दिखला जा, नच बलिए यासारख्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकला होता. इतकंच नाही, तर अदनान 2014 मधील 'मिस्टर उत्तराखंड' या स्पर्धेचा विजेताही ठरला होता. नाव कमवल्यामुळे मुलींमध्ये त्याचा बोलबाला होता. पैसे कमवण्यासाठी अदनाने दिल्लीचे क्लब्ज आणि रेस्तराँमध्ये डान्स करायला सुरुवात केली, मात्र यातून त्याला मनाजोगती कमाई झाली नाही, असं पोलिसांनी सांगितलं.
कसा आला गुन्हेगारी जगात -
राम नावाच्या एका व्यक्तीने अदनानला गुन्हेगारी जगताशी ओळख करुन दिली. आपल्या टोळीत सहभागी झाल्यास पुरेसा पैसा मिळवण्याचं आश्वासन रामने अदनानला दिलं. पैशाची गरज असल्यामुळे अदनानने होकार दिला. द्वारकामधील सेक्टर 12 मध्ये असलेल्या डॉमिनोज् पिझाच्या आऊटलेटमध्ये चोरी करण्यास अदनान तयार झाला. चोरीनंतर काही दिवसातच रामला अटक झाली. हे समजताच अदनानने घरातून पळ काढला आणि वेगवेगळ्या ठिकाणी तो लपून राहिला. अटक टाळण्यासाठी तो आपले मोबाईल नंबरही बदलत राहिला.