Manish Sisodia :"लवकरच बाहेर भेटू, तुम्ही माझं प्रेरणास्थान, शक्ती"; मनीष सिसोदियांचं जेलमधून जनतेसाठी पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 11:22 AM2024-04-05T11:22:04+5:302024-04-05T11:30:02+5:30
AAP And Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांनी विधानसभा मतदारसंघातील (पटपरगंज) लोकांना एक पत्र लिहिलं आहे.
दारू घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील (पटपरगंज) लोकांना एक पत्र लिहिलं आहे. मनीष सिसोदिया यांनी लिहिलं की, "लवकरच बाहेर भेटू. गेल्या एक वर्षात मला सर्वांची आठवण आली. आम्ही सर्वांनी मिळून अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. स्वातंत्र्याच्या वेळी जसे सर्वजण लढले, त्याचप्रमाणे आपण चांगल्या शिक्षणासाठी आणि शाळांसाठी लढत आहोत."
दिल्ली दारू घोटाळ्याच्या आरोपाखाली मनीष सिसोदिया गेल्या एक वर्षापासून तुरुंगात आहेत. याआधी बुधवारी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून सुटका झाली. सुटकेनंतर त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
या पत्रात मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी पत्रात लिहिलं की, "इंग्रजांनाही त्यांच्या सत्तेचा खूप गर्व होता, इंग्रजही लोकांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकायचे, इंग्रजांनी गांधी आणि नेल्सन मंडेला यांनाही अनेक वर्षे तुरुंगात ठेवलं. ब्रिटिशांच्या हुकूमशाहीनंतरही स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले."
"विकसित देश होण्यासाठी चांगले शिक्षण आणि शाळा असणे आवश्यक आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत शैक्षणिक क्रांती झाली याचा मला आनंद आहे. आता पंजाब शिक्षण क्रांतीची बातमी वाचून चांगलं वाटत आहे. त्याचप्रमाणे एक दिवस प्रत्येक मुलाला योग्य आणि चांगलं शिक्षण मिळेल. शिक्षण क्रांती जिंदाबाद, Love You All.”
"तुरुंगात राहिल्याने माझं तुमच्या लोकांवरचं प्रेम आणखी वाढलं आहे. तुम्ही माझे प्रेरणास्थान आहात आणि तुम्ही सर्व माझी शक्ती आहात. तुम्ही माझ्या पत्नीची खूप काळजी घेतलीत. तुमच्या सर्वांबद्दल बोलताना सीमा भावूक होते. तुम्ही सर्वजण तुमची काळजी घ्या" असं देखील मनीष सिसोदिया यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.