माजी DGMO मुळे काँग्रेसचे सर्जिकल स्ट्राईक्सचे दावे ठरले पोकळ
By admin | Published: October 7, 2016 11:17 AM2016-10-07T11:17:04+5:302016-10-07T11:17:04+5:30
मागच्या आठवडयात पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेले सर्जिकल स्ट्राईक्स यापूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईक्सपेक्षा पूर्णपणे वेगळे होते.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - भारतीय लष्कराने मागच्या आठवडयात पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेले सर्जिकल स्ट्राईक्स यापूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईक्सपेक्षा पूर्णपणे वेगळे होते असे लष्करी कारवाईचे माजी महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल विनोद भाटीया यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडिया बरोबर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. २९ सप्टेंबरला भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्समागे ठराविक हेतू, उद्दिष्टय होते. यातून दहशतवादी कारवाया करणा-यांना एक नेमका संदेश मिळाला.
या कारवाईचा स्तर, परिणाम याआधीच्या सर्जिकल स्ट्राईक्सपेक्षा पूर्णपणे वेगळा होता असे लेफ्टनंट जनरल भाटीया यांनी सांगितले. ऑक्टोंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१४ पर्यंत ते डीजीएमओ पदावर कार्यरत होते. आताच्या सर्जिकल स्ट्राईक्सची आणि याआधी झालेल्या स्ट्राईक्सची तुलना होऊ शकत नाही.
पूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईक्स कमी क्षमतेचे छोटे असल्याने त्याची परिणामकारकता कमी होती. यावेळचे सर्जिकल स्ट्राईक्स खास आहेत. त्याची परिणामकारकता, क्षमता मोठी आहे असे भाटीया यांनी सांगितले. माजी डीजीएमओच्या या खुलाशामुळे काँग्रेसचे पोकळ दावे उघडे पडले आहेत.
काँग्रेसने यूपीए दोनच्या राजवटीत १ सप्टेंबर २०११, २८ जुलै २०१३ आणि १४ जानेवारी २०१४ रोजी असे तीनवेळा सर्जिकल स्ट्राईक्स केल्याचा दावा केला होता. आमच्या राजवटीतही आतासारखेच सर्जिकल स्ट्राईक्स झाले पण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आम्ही त्याचा गवगवा केला नाही. यातून नेतृत्वाची अपरिपक्वता दिसते अशी टीका काँग्रेसने केली होती.