“अमित शाह लोकांशी खोटे बोलत आहेत तर काय करणार?”; फारूक अब्दुल्ला यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 08:18 PM2023-12-06T20:18:09+5:302023-12-06T20:21:35+5:30
Farooq Abdullah:काश्मीरमध्ये शांतता आहे, असे हे लोक म्हणतात तर मग लष्कराचे जवान का शहीद का होतात, अशी विचारणा फारूक अब्दुल्ला यांनी केली.
Farooq Abdullah: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केंद्रीय गृहमंत्री लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक २०२३ सादर केले. या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. याला आता फारूक अब्दुल्ला यांनी उत्तर दिले आहे. हे लोकांशी खोटे बोलत आहे, तर काय करणार, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
या विधेयकावर बोलताना, पंडित नेहरुंची चूक म्हणजे संयुक्त राष्ट्रात आपला मुद्दा घेऊन जाण्याची चूक. पंडित जवाहरलाल नेहरूंनी शेख अब्दुल्लांना लिहिलेले हे पत्र आहे. विरोधक विनाकारण माझ्यावर चिडचिड करत आहेत. मी नेहरूंचं पत्र वाचून दाखवत आहे. त्यांना चिडचिड करायचीच असेल, तर त्यांनी नेहरूंवर करायला पाहिजे. नेहरूंनी योग्य निर्णय घेतला असता तर पीओके भारताचा भाग असता, असा दावा अमित शाह यांनी केला. यावर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अमित शाह लोकांशी खोटे बोलत आहेत तर काय करणार?
काश्मीरमध्ये पंडित नेहरुंच्या काळात जी स्थिती होती त्यामुळे संयुक्त राष्ट्रात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. पूँछ आणि राजौरी वाचवण्यासाठी सैन्य वळवावे लागले. पूँछ आणि राजौरी भारताचा भाग आहे, तो त्याच निर्णयामुळे आहे. काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे नेला पाहिजे, हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह सगळ्यांनीच त्यांना हा सल्ला दिला होता, असे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले. तसेच संयुक्त राष्ट्रांकडे जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. या ठिकाणी शांतता प्रस्थापित होण्यासाठीच पंडित नेहरु संयुक्त राष्ट्रांकडे हा प्रश्न घेऊन गेले. आता हे (अमित शाह) लोकांशी खोटं बोलत आहेत तर काय करणार, असा सवाल फारूक अब्दुल्ला यांनी केला.
दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण संपले असे हे सांगतात. मला सांगा तिथे किती फौजा आहेत? BSF, CRPF आणि इतर फौजा आहे. इतक्या फौजा आणि लष्कर तिथे असूनही आपले जवान आणि अधिकारी मरत असतील तर त्याचे कारण काय? दहशतवाद संपला म्हणत आहेत मग हे का घडते आहे? अशी विचारणा फारूक अब्दुल्ला यांनी केली.