गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 01:46 PM2020-10-29T13:46:59+5:302020-10-29T13:47:35+5:30
Former Gujarat CM Keshubhai Patel passes away : गेल्या काही दिवसांपूर्वी केशुभाई पटेल यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती.
अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. गुरुवारी सकाळी केशुभाई पटेल यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपूर्वी केशुभाई पटेल यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केशुभाई पटेल यांच्या कुटुंबीयांशी बोलून दुःख व्यक्त केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी केशुभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
गुजरात के पूर्व मुख्यमंत्री केशुभाई पटेल जी को मेरी भावभीनी श्रद्धांजलि। गुजरात की प्रगति में और प्रदेश में भाजपा संगठन को मजबूत करने में केशुभाई का योगदान हमेशा याद रखा जायेगा। ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करें। ॐ शांति
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 29, 2020
केशुभाई पटेल यांचा जन्म २४ जुलै १९२८ ला जुनागड येथे झाला होता. अगदी लहान वयातच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले होते. त्यानंतर ते जनसंघ आणि त्यानंतर भाजपासोबत बराच काळ राजकारणात राहिले.
दोन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री
केशुभाई पटेल यांनी दोनदा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. ते १९९५ आणि १९९८ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र, २००१ मध्ये त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु, दोन्ही वेळा केशुभाई पटेल यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. याशिवाय, केशुभाई पटेल यांनी गुजरातचे उपमुख्यमंत्रीपदही सांभाळले होते. २००१ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरच नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि २०१४ पर्यंत राज्यात सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले.
गुजरातमधील भाजपाचे दिग्गज नेता
केशुभाई पटेल हे गुजरातमधील भाजपाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. त्यांनी जनसंघापासून पक्षासाठी काम केले होते. राज्यात भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून केशुभाई पटेल होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केशुभाई पटेल यांच्यासोबत बराच काळ काम केले आणि अनेकदा नरेंद्र मोदी हे केशुभाई पटेल यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात होते. दरम्यान, भाजपामधील मतभेदांमुळे केशुभाई पटेल यांनी २०१२ मध्ये आपला नवीन पक्ष स्थापन केला होता. गुजरात परिवर्तन पार्टी असे या पक्षाला नाव देण्यात आले. मात्र, २०१४ मध्ये केशुभाई पटेल यांनी पुन्हा आपला पक्ष भाजपामध्ये विलीन केला.