हिमाचलचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांना झटका; पत्नीला दरमहा ४ लाख रूपये द्यावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 03:20 PM2024-02-17T15:20:18+5:302024-02-17T15:21:07+5:30
हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या कोर्टाच्या निकालानंतर अडचणी वाढल्या आहेत.
माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव आणि विद्यमान मंत्री विक्रमादित्य सिंह यांना कोर्टाने मोठा झटका दिला आहे. हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या कोर्टाच्या निकालानंतर अडचणी वाढल्या आहेत. कारण त्यांना पत्नी सुदर्शना सिंह यांना दर महिन्याला पोटगी म्हणून ४ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. उदयपूर कौटुंबिक न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. विक्रमादित्य सिंह हे हिमाचलचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव आहेत. त्यांची पत्नी सुदर्शना सिंह या उदयपूरच्या अमेट येथील रहिवासी आहेत.
काँग्रेस नेते तथा आमदार आणि मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्यावर त्यांची पत्नी सुदर्शना सिंह यांनी घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. विक्रमादित्य सिंह यांची आई प्रतिभा सिंह आणि बहिणीशिवाय कुटुंबातील इतर सदस्यांवर देखील छळाचा आरोप आहे. विक्रमादित्य यांच्या पत्नी सुदर्शना यांच्या वकिलाने सांगितले की, राजसमंदच्या अमेट घराण्यातील मुलीचा विवाह माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव विक्रमादित्य यांच्याशी ८ मार्च २०१९ रोजी झाला होता. बराच काळ एकत्र राहिल्यानंतर दोघांमधील संबंध बिघडले. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर सुदर्शना सिंह यांना उदयपूरला पाठवण्यात आले. यावेळी त्यांचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला.
विक्रमादित्य सिंह यांना झटका
सुदर्शना यांनी उदयपूर न्यायालयात महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण या कायद्याच्या कलम २० अंतर्गत तक्रार दाखल केली होती. सुदर्शना यांनी तक्रारीत आरोप केला की, लग्नानंतर त्या शिमला येथे सासरच्या घरी आल्या आणि काही काळानंतर त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला.
पत्नीचे गंभीर आरोप
सुदर्शना यांनी तक्रारीत म्हटले की, ८ मार्च २०१९ रोजी आमदार विक्रमादित्य सिंह यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. राजस्थानमधील कनोटा गावात हिंदू रितीरिवाजानुसार हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर त्या सासरच्या घरी आल्या. तिथे त्यांचा मानसिक छळ झाला. सासरच्यांनी त्यांच्या नातेवाईकांना म्हणजेच सुदर्शना यांच्या नातेवाईकांना शिमला येथे बोलावले आणि त्यांना जबरदस्तीने उदयपूरला पाठवले. तसेच आपल्या तक्रारीत सुदर्शना यांनी त्यांच्या सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होऊ नये, अशी विनंती न्यायालयाला केली. याशिवाय वेगळे राहण्यासाठी घराची व्यवस्था करण्याची मागणी देखील त्यांनी केली.