जेडीयूमध्ये मनीष वर्मा यांना मोठी जबाबदारी, नितीश कुमारांनी बनवले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 05:03 PM2024-07-11T17:03:28+5:302024-07-11T17:04:03+5:30
manish verma : आर सीपी सिंह यांच्यानंतर मनीष वर्मा हे नितीश कुमार यांच्या पसंतीचे दुसरे आयएएस अधिकारी आहेत.
पटणा : माजी आयएएस अधिकारी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अतिरिक्त सल्लागार मनीष वर्मा यांना जेडीयूमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी मनीष वर्मा यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवले आहे. नुकताच मनीष वर्मा यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आर सीपी सिंह यांच्यानंतर मनीष वर्मा हे नितीश कुमार यांच्या पसंतीचे दुसरे आयएएस अधिकारी आहेत. आधी त्यांनी अधिकारी म्हणून नितीश कुमार यांच्यासोबत काम केले आणि आता जेडीयूमध्ये दाखल झाले आहेत. एकेकाळी आरसीपी सिंह हे नितीश कुमार यांचे उत्तराधिकारी मानले जात होते, पण आता ते पक्षात नाहीत. यानंतर आता नितीश कुमार यांनी मनीष वर्मा यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी दिली आहे.
विशेष राज्य दर्जा किंवा विशेष पॅकेजवर चर्चा
यापूर्वी जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत संजय झा यांना मोठी जबाबदारी देण्यात आली होती. त्यांना कार्यवाह अध्यक्ष करण्यात आले. या बैठकीत बिहारला विशेष राज्याचा दर्जा किंवा विशेष पॅकेज या मुद्द्यावरही चर्चा झाली.
नितीश कुमारांच्या नेतृत्वात आगामी निवडणुका लढवणार
झारखंड विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत लोकसभा निवडणूक आणि आगामी बिहार विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्याबाबतही चर्चा झाली. २०२५ च्या बिहार विधानसभेच्या निवडणुका मुख्यमंत्री नितीश यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या जातील, असे स्पष्टपणे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
नितीश कुमार नेहमीच एनडीएचा भाग राहतील
नेहमीच एनडीएचा भाग असतील, असे स्वत: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीसमोर घोषणा केली आहे, असे जेडीयू नेते केसी त्यागी यांनी एका बैठकीनंतर सांगितले होते. तसेच, राज्याला विशेष दर्जा आणि पॅकेज मिळावे यासाठी आम्ही लढत राहू. बिहार उच्च न्यायालयाने आरक्षणावर बंदी घातल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असेही केसी त्यागी म्हणाले होते.