माजी IFS अधिकारी तरणजीतसिंग संधू यांचा भाजपात प्रवेश; 'या' जागेवरुन लोकसभा लढवणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 06:27 PM2024-03-19T18:27:27+5:302024-03-19T18:29:32+5:30
अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम करणारे माजी IFS अधिकारी तरनजीत सिंग संधू यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भारतीय जनता पक्षात अनेकांचे इनकमिंग सुरू आहे. आज(दि.19) अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम करणारे माजी IFS अधिकारी तरनजीत सिंग संधू यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. अमृतसरचे रहिवासी असलेले संधू आता सक्रिय राजकारणात हात आजमावणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप त्यांना अमृतसर मतदारसंघातून तिकीट देऊ शकते, अशी चर्चा आहे. खुद्द संधू यांनीही याबाबतचे संकेत दिले आहेत.
संबधित बातमी- झारखंड मुक्ती मोर्चाला धक्का; भाजपात सामील झाल्या सीता सोरेन, काही तासांपूर्वी सोडला पक्ष
भाजप नेते विनोत तावडेंसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीतील भाजप मुख्यालयात संधू यांचा पक्षप्रवेश झाला. पक्षाचे सदस्यत्व घेतल्यानंतर संधू म्हणाले, "गेल्या 10 वर्षांमध्ये मी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात काम केले आहे. विशेषत: युनायटेड स्टेट्स आणि श्रीलंका संबंधांमध्ये. पंतप्रधान मोदींचे नेहमी विकासावर लक्ष केंद्रित असते. आज आपल्या देशाला विकासाची नितांत गरज आहे. हा विकास अमृतसरपर्यंतही पोहोचला पाहिजे. त्यामुळे मी ज्या पक्षात प्रवेश करत आहे, त्या पक्षाचे पक्षाध्यक्ष, पंतप्रधान, गृहमंत्री यांचे मी आभार मानतो. पक्षाने मला जबाबदारी दिली, तर अमृतसरच्या विकासासाठी नक्कीच निवडणूक लढवेन."
VIDEO | Here's what former Ambassador of India to the US Taranjit Singh Sandhu (@SandhuTaranjitS) said after joining BJP.
— Press Trust of India (@PTI_News) March 19, 2024
"As I have indicated, the foreign policy today is very closely associated with development and I joining BJP also is focused on helping my home city, which… pic.twitter.com/5s0yx4koA2
कोण आहेत तरणजीत सिंग संधू?
1988 च्या बॅचचे IFS अधिकारी असलेल्या तरणजीत सिंग संधू यांनी या वर्षी जानेवारीमध्ये अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केला आणि सरकारी सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी 3 फेब्रुवारी 2020 रोजी हर्षवर्धन श्रृंगला यांच्या जागी अमेरिकेतील राजदूत म्हणून पदभार स्वीकारला होता. याशिवाय त्यांनी श्रीलंकेत भारताचे उच्चायुक्त म्हणूनही काम केले आहे.
तीस वर्षांच्या आपल्या प्रतिष्ठित कारकिर्दीत संधू यांनी सोव्हिएत युनियनमध्येही भारताची भक्कम बाजू मांडली. यानंतर त्यांना युक्रेनमध्येही भारताचे राजदूत म्हणून पाठवण्यात आले होते. जुलै 2005 ते फेब्रुवारी 2009 या कालावधीत संयुक्त राष्ट्र, न्यूयॉर्कमधील भारताच्या स्थायी मिशनमध्येही त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली. सप्टेंबर 2011 ते जुलै 2013 या कालावधीत फ्रँकफर्टमध्ये भारताचे कौन्सुल जनरल म्हणून काम केले आणि परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव (संयुक्त राष्ट्र) आणि नंतर मार्च 2009 ते ऑगस्ट 2011 या काळात संयुक्त सचिव (प्रशासन) म्हणून काम पाहिले.