भारताचे माजी हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 01:35 PM2024-03-24T13:35:58+5:302024-03-24T13:36:16+5:30

भारतात राफेल लढाऊ विमान आणण्यात आरकेएस भदौरिया यांची महत्वाची भूमिका होती.

Former Indian Air Force chief Rakesh Kumar Singh Bhadauria joins BJP | भारताचे माजी हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांचा भाजपात प्रवेश

भारताचे माजी हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांचा भाजपात प्रवेश

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षात सुरू असलेली इनकमिंग थांबायचे नाव घेत नाही. आता भारताचे माजी हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया (RKS Bhadauria) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्या उपस्थितीत भदौरिया यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी वायएसआरसीपी (YSRCP) नेते वरप्रसाद राव वेलागपल्ली यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. 

'मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित'
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी या दोन्ही नेत्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी अनुराग ठाकूर म्हणाले की, आरकेएस भदौरिया आणि व्ही प्रसाद राव यांचे जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षात स्वागत आहे. भदौरिया आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेत खूप सक्रिय आहेत, आता त्यांचे योगदान राजकीय व्यवस्थेत असणार आहे. व्ही प्रसाद राव यांच्याबाबत बोलताना ठाकूर म्हणाले की, मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रसाद राव भाजपमध्ये आले आहेत. तसेच, सरकारचे कौतुक करताना ते म्हणतात, मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे. यामुळेच आरके भदौरिया सरांसारखे लोकही भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

'विकसित भारताचा संकल्प पूर्ण करू'
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत. राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचे आभार मानतो. मी भारतीय हवाई दलात चार दशकांहून अधिक काळ सेवा केली, मात्र भाजप सरकारच्या नेतृत्वाखालील 8 वर्षे माझ्या सेवेचा सर्वोत्तम काळ होता. सरकारने देशाच्या सशस्त्र दलांचे बळकटीकरण आणि आधुनिकीकरण, तसेच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे लष्कराच्या क्षमतेत वाढ झाली आहेच, शिवाय सैन्याला नवा आत्मविश्वासही मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा संकल्प पूर्ण करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

आरकेएस भदौरिया यांचा परिचय
आरकेएस भदौरिया पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी आहेत. भदौरिया बसप्टेंबर 2021 मध्ये हवाई दलातून निवृत्त झाले होते. त्यांना संरक्षण सेवेचा चार दशकांहून अधिक अनुभव आहे. 4250 तासांहून अधिक उड्डाण केले असून 26 विविध प्रकारच्या लढाऊ विमानांचा त्यांना अनुभव आहे. भदौरिया यांनी मार्च 2017 ते ऑगस्ट 2018 पर्यंत सदर्न एअर कमांडचे कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम केले. 36 वर्षांच्या कारकिर्दीत आरकेएस भदौरिया यांना अति विशिष्ट सेवा पदक, वायु सेना पदक आणि परम विशिष्ट सेवा, यासह अनेक पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

राफेल भारतात आणण्यात महत्वाची भूमिका

भारताने फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी एक टीम तयार केली होती. या टीमचे नेतृत्व माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांच्याकडे होते. त्यावेळी ते हवाई दलाचे उपप्रमुख होते. भदौरिया यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि फ्रान्समध्ये अनेक अडथळे पार करत राफेल विमानांचा करार झाला. विमानांसाठीचा करार सप्टेंबर 2016 मध्ये झाला होता. भदौरिया यांच्या योगदानाची ओळख म्हणून, त्यांच्या नावाची दोन अक्षरे, RB008 पहिल्या राफेल विमानावर कोरली गेली आहेत.

एवढेच नाही तर स्वदेशी तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) कार्यक्रम तयार करण्यातही भदौरिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. माजी हवाई दल प्रमुख तेजस कार्यक्रमाशी जवळून संबंधित होते. ते LCA प्रकल्पावरील राष्ट्रीय उड्डाण केंद्राचे मुख्य चाचणी पायलट आणि प्रकल्प संचालक होते. तेजसच्या सुरुवातीच्या प्रोटोटाइप फ्लाइट चाचण्यांमध्ये भदौरियांचाही सहभाग होता.

 

Web Title: Former Indian Air Force chief Rakesh Kumar Singh Bhadauria joins BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.