'भस्मासुर'वरून वाद! हिंदी वर्तमानपत्रावर गौतम गंभीर संतापला; २ कोटींची नुकसान भरपाई मागितली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 01:44 PM2023-05-17T13:44:39+5:302023-05-17T13:45:34+5:30
भाजप खासदार गौतम गंभीरने हिंदी वर्तमानपत्राविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.
नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने हिंदी वर्तमानपत्राविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. पंजाब केसरी या हिंदी वर्तमानपत्राविरूद्ध गंभीरने दिल्ली उच्च न्यायालयात हा खटला दाखल केला. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये भारताचा माजी खेळाडू लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे. त्याने दिल्ली उच्च न्यायालयात २ कोटींची नुकसान भरपाई मागितली असून पंजाब केसरीविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.
दरम्यान, गौतम गंभीरने पंजाब केसरीचे संपादक आदित्य चोप्रा आणि पत्रकार अमित कुमार आणि इम्रान खान यांच्यावर पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याबद्दल आणि त्याला लक्ष्य करून अनेक बनावट आणि बदनामीकारक बातम्या प्रकाशित केल्याबद्दल खटला दाखल केला आहे.
लखनौविरूद्धच्या पराभवानंतर मुंबईचे कोच भडकले; गोलंदाजांवर फोडलं खापर, म्हणाले...
गंभीरने वकील जय अनंत देहरदाई यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या खटल्यात म्हटले की, हिंदी वर्तमानपत्राने त्यांच्या अनेक रिपोर्ट्समध्ये आपल्याबद्दल चुकीची माहिती प्रसारित केली आहे. 'बार ॲंड बेंच'च्या रिपोर्ट्सनुसार, पंजाब केसरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये गंभीरची तुलना राक्षस 'भस्मासुर'शी करण्यात आली होती. खटल्यात केलेल्या दाव्यानुसार, पंजाब केसरीच्या एका रिपोर्टमध्ये गंभीर हा जातिवादी व्यक्ती आणि असभ्य राजकारणी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
गंभीरने पंजाब केसरीविरूद्ध दाखल केलेल्या खटल्यात दिलेल्या बाबी खालीलप्रमाणे -
- खासदार गौतम गंभीर बेपत्ता सर्वत्र लागले पोस्टर.
- दिल्लीचे बेपत्ता खासदार लखनौ सुपर जायंट्ससाठी बनले भस्मासुर'.
- आदेश गुप्ता बोलत राहिले, गौतम गंभीर उठून गेला.
अशातच गंभीरने २ कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे, जी अनाथ संघटनांना दिली जाईल. गंभीरने हे देखील सांगितले की, पंजाब केसरीचे संपादक आणि पत्रकार यांना कोणत्याही अटीशिवाय त्याची माफी मागावी लागेल. तसेच हा माफीनामा सर्वत्र प्रसारित केला पाहिजे असे गंभीरने म्हटले आहे.