पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर; शासकीय इतमामात मिल्खा सिंग यांच्यावर होणार अत्यंसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 05:23 PM2021-06-19T17:23:18+5:302021-06-19T18:03:56+5:30
पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
चंदीगड : भारताचे माजी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी रात्री निधन झाले. एक महिन्यापासून त्यांचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी व भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी कोरोना संक्रमणामुळे पाच दिवसांपूर्वी अखेरचा श्वास घेतला होता.
पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा आणि भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंग व तीन मुली असा परिवार आहे. शुक्रवारी संध्याकाळपासूनच त्यांची प्रकृती खालावली होती. ऑक्सिजनची पातळीही खूप कमी झाली होती. गेल्याच महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मिल्खा यांची कोरोना चाचणी बुधवारी निगेटिव्ह आली होती.
मिल्खा सिंग यांच्यावर शनिवारी संध्याकाळी संपूर्ण राज्य सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एका महिन्यासाठी कोरोना संक्रमणाशी झुंज देऊन रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. मिल्खा सिंह यांच्या निधनावर पंजाब सरकारने एक दिवस राज्य शोक जाहीर केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी धावपटू मिल्खा सिंग यांच्या निवासस्थानी शेवटच्या दर्शनापर्यंत पोहोचले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.
देशाचे अभिमान असलेले महान धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करणार असल्याची घोषणा पंजाब सरकारने केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मिल्खा सिंग यांच्या सन्मानार्थ एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
Former Indian sprinter Milkha Singh will be given State funeral by Punjab Government. Also, Punjab will observe one day of State mourning as a mark of respect: Punjab Chief Minister Captain Amarinder Singh pic.twitter.com/vDFhCiHLJy
— ANI (@ANI) June 19, 2021
दरम्यान, मिल्खा सिंग यांनी चार वेळा आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले असून १९५८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी केली होती. १९६० सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये काही शतांशच्या फरकाने त्यांचे कांस्य पदक हुकले होते. १९५९ साली मिल्खा सिंग यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.