भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 11:28 PM2019-11-10T23:28:34+5:302019-11-11T06:37:46+5:30
भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं रविवारी रात्री निधन झालं.
नवी दिल्लीः आदर्श निवडणूक आचार संहिता कठोरपणे राबवून निवडणूक सुधारणांसह भारतीय निवडणूक आयोगाला नवीन चेहरा देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं रविवारी रात्री निधन झालं. भारताचे 10वे मुख्य निवडणूक आयुक्त राहिलेल्या टी. एन. शेषन यांनी वयाच्या 86व्या वर्षी चेन्नईतल्या निवासस्थानी रात्री 9.30 वाजताच्यादरम्यान अखेरचा श्वास घेतला. भारताच्या निवडणूक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याचं श्रेय टी .एन. शेषन यांना दिलं जातं.
शेषन हे वर्ष 1990 ते 1996पर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. मुख्य निवडणूक आयुक्त होण्यापूर्वी त्यांनी 1989मध्ये भारताच्या 18व्या कॅबिनेट सचिवपदाचा पदभार सांभाळला होता. 1996मध्ये त्यांनी सरकारी सेवेत दिलेल्या विशेष योगदानामुळे त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. मतदार ओळखपत्राची सुरुवातही त्यांनी केली होती. त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.
त्यांचे पूर्ण नांव तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन (टी. एन. शेषन) होते. तामिळनाडूच्या 1955च्या तुकडीतील ते आयएएस अधिकारी होते. ते भारताचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त होते. वाढत्या वयामुळे ते काही वर्षांपासून घरातच राहत होते. त्यांनी 1997मध्ये के. आर. नारायण यांच्याविरुद्ध राष्ट्रपतीपदाची आणि त्यानंतर दोन वर्षांनी काँग्रेसच्या तिकिटावर लालकृष्ण अडवाणी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती; परंतु, त्यांना यश आले नव्हते. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील तिरुनेलईमध्ये 15 डिसेंबर 1932 रोजी त्यांचा जन्म झाला होता. अमेरिकेतल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी सार्वजनिक प्रशासना(Public Administration)ची पदवी मिळवली होती.
Prime Minister Narendra Modi: Shri TN Seshan was an outstanding civil servant. He served India with utmost diligence and integrity. His efforts towards electoral reforms have made our democracy stronger and more participative. Pained by his demise. Om Shanti. https://t.co/3tkYHLtvSBpic.twitter.com/fGjB6eXkHi
— ANI (@ANI) November 10, 2019
टी. एन. शेषन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी निवडणूक सुधारणांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे भारतीय लोकशाही बळकट झाली. ते उत्कृष्ट अधिकारी होते. त्यांनी मेहनतीने आणि सचोटी देशसेवा केली, असे त्यांनी टि्वटवर म्हटले आहे. तामिळनाडूत जन्मलेल्या या अधिका-याने भारतातील निवडणुकीच्या प्रक्रियेत अनेक सुधारणा केल्या. अर्थात शेषन यांना ते करताना प्रचंड विरोधही झाला. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणुकीतील आमूलाग्र बदलांना विरोध केला, पण या गृहस्थाने कुठल्याही दबावाला बळी न पडता निवडणुकीत सुधारणा घडवून दाखवल्या, त्यामुळे आज ज्या काही निकोप निवडणुका होत आहेत, त्याचे श्रेय फक्त आणि फक्त टी. एन. शेषन यांच्याकडे जाते. निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी त्यांच्या कार्यकाळापासून सुरू झाली. कधीही, कुठेही, कसाही प्रचार करणे, ध्वनिक्षेपणाचा अमर्यादित वापर अशांमुळे होणारा त्रास, याचा कुठेही विचार केला जात नव्हता, त्यालासुद्धा टी. एन. शेषन यांनीच चाप बसविला.
Tamil Nadu: Former Chief Election Commissioner of India, T N Seshan passed away in Chennai, after a cardiac arrest. https://t.co/sfyRzjNFJT
— ANI (@ANI) November 10, 2019
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत प्रचार करण्यास प्रतिबंध, सार्वजनिक ठिकाणी होणा-या जाहीर सभा, त्यामुळे वाहतुकीस होणारी अडचण, नागरिकांचा खोळंबा यावर कडक बंदी आणली गेली. रस्त्यावर कुठेही सभा न घेता सभांसाठी निवडणूक आयोग ठरवेल त्याच जागी सभा घेणे. प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा होणारा गैरवापर पूर्णत: बंद करणे. धर्माच्या नावावर, देवांच्या नावावर, राष्ट्रीय पुरुषांच्या नावावर मते मागण्यास बंदी त्यांनीच आणली. ध्वनिक्षेपक वापर रात्री 10नंतर बंद म्हणजे बंद! मग तो कुणीही असो. परवानगी नाही, असे अनेक बदल टी. एन. शेषन यांनी केले.
>देशाच्या निवडणूक यंत्रणेत सुधारणा आणि तिचे बळकटीकरण करण्याचे मोठे काम टी.एन. शेषन यांनी केले. लोकशाहीची ओळख करून देणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख कायम राहील. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री.
>मी यासाठी मनापासून शोक व्यक्त करतो की, निवडणूक सुधारणांमध्ये टी.एन. शेषन यांनी दिलेले योगदान आमच्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे.
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री.