मतदान संपले, दुसऱ्या दिवशी भाजप उमेदवाराचा मृत्यू; जम्मू काश्मीरमध्ये मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 01:19 PM2024-10-02T13:19:28+5:302024-10-02T13:21:17+5:30

जम्मू काश्मीरमध्ये भाजपचे उमेदवार मुश्ताक अहमद शाह बुखारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

Former Jammu and Kashmir minister and BJP candidate from Surankote Mushtaq Ahmed Shah Bukhari died on Wednesday | मतदान संपले, दुसऱ्या दिवशी भाजप उमेदवाराचा मृत्यू; जम्मू काश्मीरमध्ये मोठा धक्का

मतदान संपले, दुसऱ्या दिवशी भाजप उमेदवाराचा मृत्यू; जम्मू काश्मीरमध्ये मोठा धक्का

Mushtaq Ahmad Bukhari passes away: जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान नुकतच पार पडलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी शेवटच्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील ४० जागांवर मतदान झाले आणि आता ८ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधीच भाजपला जम्मू काश्मीरमध्ये मोठा धक्का बसला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मंत्री आणि भाजपचे सुरणकोटमधील उमेदवार मुश्ताक अहमद शाह बुखारी यांचे बुधवारी निधन झाले. निवडणुकीच्या काळातच मुश्ताक बुखारी यांचे निधन झाल्याने भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री आणि सुरनकोटमधील भाजपचे उमेदवार मुश्ताक अहमद शाह बुखारी यांचे बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील राहत्या घरी निधन झाले. मुश्ताक अहमद शाह बुखारी हे ७५ वर्षांचे होते आणि त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. बुखारी काही दिवसांपासून अस्वस्थ होते आणि सकाळी सात वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी बुखारी यांना मृत घोषित केले.

सुरणकोटचे दोन वेळा माजी आमदार राहिलेले बुखारी यांनी फेब्रुवारीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. केंद्राने बुखारी यांच्या पहाडी समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिल्यानंतर ते भाजपमध्ये गेले होते. २५ सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालेल्या सुरनकोटमधून भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. अनुसूचित जमातीच्या दर्जाबाबत पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्याशी झालेल्या वादानंतर बुखारी यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये चार दशकानंतर नॅशनल कॉन्फरन्स सोडली होती.

बुखारींच्या जागेवर पुन्हा निवडणूक होणार का?

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानापूर्वी उमेदवाराचा मृत्यू झाल्यास निवडणूक आयोग त्या जागेवरील निवडणूक रद्द करतो आणि त्यानंतर मतदानासाठी नवीन तारीख जाहीर केली जाते. मात्र मतदानानंतर उमेदवाराचा मृत्यू झाल्यास निश्चित वेळापत्रकानुसार मतांची मोजणी केली जाते आणि मतमोजणीत मृत उमेदवार विजयी झाल्यास निवडणूक रद्द केली जाते. त्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदीनुसार १९५१ च्या कलम १५१ अ अंतर्गत त्या जागेवर सहा महिन्यांच्या आत पुन्हा निवडणुका घेतल्या जातात. त्याचवेळी उमेदवाराचा नामांकनापूर्वी मृत्यू झाल्यास निवडणूक आयोग त्या पक्षाला दुसरा उमेदवार उभा करून उमेदवारी दाखल करण्याची संधी देते.
 

Web Title: Former Jammu and Kashmir minister and BJP candidate from Surankote Mushtaq Ahmed Shah Bukhari died on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.