नरेंद्र मोदींच्या मित्राला मोठा सन्मान, शिंजो आबेंना पद्मविभूषण!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 10:39 PM2021-01-25T22:39:35+5:302021-01-25T22:54:49+5:30
Former Japan PM Shinzo Abe : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्राने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. यात ७ जणांना पद्म विभूषण, १० जणांना पद्म भूषण आणि १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
शिंजो आबे हे जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेले पहिलेच पंतप्रधान आहेत. भारत आणि जपान यांच्यातील संबंध वृद्धिगंत करण्यास शिंजो आबे यांचा मोठा वाटा आहे. तसेच, २०१७ मध्ये जपानचे पंतप्रधान असताना शिंजो आबे हे भारतात आले होते. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. शिंजो आबे यांची गळाभेट घेत नरेंद्र मोदींनी त्यांचे स्वागत केले होते.
याचबरोबर, २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी जपानच्या एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिंजो आबे यांनी नरेंद्र मोदी हे सर्वात विश्वासू मित्र असल्याचे मत व्यक्त केले होते. "मोदी अत्यंत विश्वासू मित्र आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारत जगात एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून उदयाला येत आहे. त्यांचे जपानमध्ये स्वागत करणे, हे माझ्यासाठी सौभाग्याचे आहे', असे शिंजो आबे यांनी म्हटले होते.
गेल्या वर्षी शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थामुळे जपानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी उपचाराअभावी पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळता येणार नसल्यामुळे शिंजो आबे यांनी जनतेची माफी मागत राजीनाम्याची घोषणा केली होती. शिंजो आबे यांनी पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढणारे ट्विट केले होते. त्याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे शब्द काळजाला भिडले असल्याचे सांगत भारत आणि जपान यांच्यातील संबंध आणखी वृद्धिगंत होतील, असा विश्वासही शिंजो आबे यांनी व्यक्त केला होता.
दरम्यान, पद्म पुरस्कारांमध्ये उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंताना सन्मान जाहीर झाला आहे. या पद्म पुरस्कारात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रह्मण्यम, डॉ. बी. एम. हेगडे, नरिंदर सिंह कापन्य, मौलाना वहिदुद्दीन खान, बी. बी. लाल, सुदर्शन साहो यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. याचबरोबर महाराष्ट्रातील उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर समाजसेविका सिंधुताई सपकाळ, पुरुषोत्तम गंगावणे, नामदेव कांबळे, जयंतीबेन पोपट, गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.