मी धाडसी योद्ध्याची पत्नी! पती अटकेत अन् लग्नाचा १८ वा वाढदिवस; कल्पना सोरेन भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 01:42 PM2024-02-07T13:42:11+5:302024-02-07T13:43:15+5:30
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक होऊन आठवडा उलटला आहे.
आदिवासी राज्य म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या झारखंडचे राजकारण मागील काही दिवसांपासून देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक होऊन आठवडा उलटला आहे. जमीन घोटाळ्यासंदर्भात ईडीचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन यांनी त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. खरं तर आज बुधवारी त्यांच्या लग्नाचा अठरावा वाढदिवस आहे. पण या खास दिवशी पती सोबत नसल्याने कल्पना सोरेन यांनी एक भावनिक पोस्ट केली अन् हेमंत सोरेन यांच्या धाडसाला दाद दिली.
कल्पना सोरेन म्हणाल्या की, आज प्रथमच आमच्या लग्नाच्या वाढदिवशी आमच्यासोबत हेमंत सोरेन नाहीत. त्यांनी झारखंडचे अस्तित्व आणि अस्मिता जपण्यासाठी नतमस्तक होणे कधीही स्वीकारले नाही. षडयंत्राचा सामना करणे आणि त्यास पराभूत करण्यासाठी स्वतःला समर्पित करणे हे त्यांना चांगले वाटले. आम्हाला विश्वास आहे की ते या कटाचा नक्कीच पराभव करतील आणि विजयी होऊन लवकरच आमच्यासोबत सामील होईल. झारखंडीच्या योद्ध्याची मी पत्नी आहे. आज मी भावनिक होणार नाही. हेमंत सोरन यांच्याप्रमाणे मी देखील कठीण प्रसंगातही हसत राहीन आणि त्यांचे धैर्य आणि संघर्षाचे बळ बनेन.
झारखण्ड के अस्तित्व और अस्मिता की रक्षा के लिए हेमन्त जी ने झुकना स्वीकार नहीं किया। उन्होंने षड्यंत्र से लड़ना और उसे हराने के लिए अपने आप को समर्पित करना बेहतर समझा।
— Hemant Soren (@HemantSorenJMM) February 7, 2024
आज हमारी शादी की 18वीं सालगिरह है, पर हेमन्त जी परिवार के बीच नहीं हैं। बच्चों के साथ नहीं हैं। विश्वास है वो… pic.twitter.com/aBnXEugVkB
हेमंत सोरेन यांना ईडीने जमिनीशी संबंधित एका घोटाळ्यात अटक केली. हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन मुख्यमंत्री होणार अशी अटकळ बांधली जात होती, मात्र अखेरच्या क्षणी चंपई सोरेन यांना झारखंडचे मुख्यमंत्री करण्यात आले. झारखंडच्या नव्या सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. दरम्यान, पती तुरुंगात गेल्यानंतर कल्पना सोरेन राजकारणात सक्रिय झाल्या आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्यांची नुकतीच भेट घेतली. कल्पना सोरेन बुधवारी एजन्सी कार्यालयात जाऊन हेमंत सोरेन यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.