लोकसभेचे माजी अध्यक्ष बलराम जाखड यांचे निधन
By admin | Published: February 4, 2016 02:59 AM2016-02-04T02:59:08+5:302016-02-04T02:59:08+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉ. बलराम जाखड यांचे बुधवारी सकाळी ७ वाजता दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष डॉ. बलराम जाखड यांचे बुधवारी सकाळी ७ वाजता दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. मस्तिष्काघातामुळे ते आजारी होते. गेल्या महिन्यापासून त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या मागे दोन पुत्र, दोन कन्या आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. पंजाबच्या अबोहरजवळील पंचकोसी या मूळ गावी उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री आणि विविध पदांवर काम करताना त्यांनी भरीव योगदान दिले. १९८० ते ८९ या काळात लोकसभेचे अध्यक्ष असताना संसदेत संग्रहालय उभारण्यात, तसेच सभागृहाच्या कामकाजाचे संगणकीकरण करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. सर्वमान्य नेते म्हणूनच नव्हे, तर विरोधकाकडूनही ते प्रशंसेस पात्र ठरले होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात १९९१ मध्ये ते कृषिमंत्री राहिले होते. त्यांनी ३० जून २००४ ते ३० मे २००९ या काळात मध्यप्रदेशचे राज्यपालपद भूषविले होते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)