माजी मंत्री अमरिश पटेल भाजपत जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 05:00 AM2019-10-01T05:00:06+5:302019-10-01T05:00:39+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अमरिश पटेल हे येत्या एक-दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अमरिश पटेल हे येत्या एक-दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी ही घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विधानाला दुजोरा दिला. पटेल यांचे कट्टर समर्थक असलेले धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनी सोमवारी भाजपत प्रवेश केला.
अमरिश पटेल हे काँग्रेसचे धुळे जिल्ह्यातील बडे नेते असून विधान परिषदेचे सदस्य आहेत. मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित अशा श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे ते अध्यक्ष आहेत.
१९९० पासून चार वेळा ते शिरपूरमधून काँग्रेसतर्फे विजयी झाले. २००९ मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव झाल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक काशीराम पावरा आमदार आहेत. पावरा यांच्यासोबत शिरपूरचे माजी नगराध्यक्ष आणि तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही भाजपत प्रवेश केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार आदी उपस्थित होते.
अमरिश पटेल भाजपमध्ये येणार असल्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यावेळी दुजोरा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भाजपत प्रवेश करीत असल्याचे काशीराम पावरा यांनी सांगितले.