माजी मंत्री मतंग सिंग यांना अटक
By admin | Published: January 31, 2015 11:36 PM2015-01-31T23:36:41+5:302015-01-31T23:36:41+5:30
कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने शनिवारी माजी केंद्रीय मंत्री मतंग सिंग यांना कोलकाता येथे अटक केली.
शारदा चिटफंड घोटाळा : सीबीआयकडून सात तास कसून चौकशी
कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयने शनिवारी माजी केंद्रीय मंत्री मतंग सिंग यांना कोलकाता येथे अटक केली. मतंग सिंग यांना सीबीआय कार्यालयात बोलावून त्यांची सात तास चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना अटक झाली.
मतंग सिंग यांना शारदा रियल्टी प्रकरणी गुन्हेगारी कट आणि फसवणुकीच्या आरोपात अटक करण्यात असल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. मतंग सिंग यांची याआधी शारदाप्रकरणी दिल्लीत सक्तवसुली संचालनालयाकडूनही चौकशी करण्यात आली होती. शनिवारी अटक करण्याआधी सीबीआयने त्यांची सात तास चौकशी केली, असे हा प्रवक्ता म्हणाला. मतंग सिंग हे सीबीआयच्या समन्सनुसार सकाळी सीबीआय कार्यालयात दाखल झाले.
सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांना शारदा समूहाचा प्रमुख सुदीप्तो सेन याच्याशी केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या चौकशीसाठी बोलावले होते. ‘एखाद्याशी व्यावसायिक संबंध ठेवणे हा काही गुन्हा नाही. आपण सुदीप्तो सेन यांना अजिबात ओळखत नाही,’ असे मतंग सिंग यांनी सीबीआय कार्यालयात जाण्याआधी पत्रकारांना सांगितले होते. (वृत्तसंस्था)
४ओडिशातील मायक्रो फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या १४ ठिकाणांवर सीबीआयने शनिवारी छापे घातले. सीबीआयतर्फे चौकशी करण्यात येत असलेल्या ४४ चिटफंड कंपन्यांमध्ये मायक्रो फायनान्स लिमिटेडचा समावेश आहे. कंपनी ज्या ठिकाणी व्यापार करीत आहे, त्या सर्वच ठिकाणी हे छापे घालण्यात आले आहेत. यात कंपनीच्या भुवनेश्वर, कटक आणि बेहरामपूर येथील कार्यालयांचा समावेश आहे,
अशी माहिती सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासोबतच मायक्रो फायनान्स लिमिटेडचे माजी प्रबंध संचालक दुर्गाप्रसाद मिश्रा, संचालक अशोक पटनायक आणि अन्य संचालकांच्या निवासस्थानीही छापे घालण्यात आल्याचे वृत्त आहे.