इम्रान खानची पक्षाच्या माजी आमदाराकडून पोलखोल; मोदींकडे मदतीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 10:19 AM2019-09-10T10:19:31+5:302019-09-10T10:19:49+5:30
पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख समुदायाचे लोक अल्पसंख्यांक म्हणून गणले जातात.
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते, ही बाब काही लपून राहिलेली नाही. तेथील पंतप्रधानांनाच बॉम्बने उडवून दिले जाते. मग सामान्यांची काय सुरक्षा असेल. पाकिस्तानमध्येहिंदू अल्पसंख्यांक आहेत. त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच उठत असतो. पाकिस्तानपासून जगाला धोका असल्याचे आरोपही केले जात आहेत.
पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख समुदायाचे लोक अल्पसंख्यांक म्हणून गणले जातात. मात्र, पाकिस्तानात केवळ अल्पसंख्यांकच नाहीत तर मुस्लिमही सुरक्षित राहू शकत नसल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या तेहरीक ए इन्साफ पक्षाचे माजी आमदार बलदेव सिंग यांनी केला आहे.
आम्ही अल्पसंख्यांक आहोत, यामुळे तेथे आम्हाला अनेक जटील समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे मी भारत सरकारकडे इथेच आश्रय देण्याची विनंती करत आहे. मी पुन्हा माघारी जाणार नाही, असे सिंग यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख सुरक्षित नाहीत. इम्रान खान यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. जेव्हा माझ्यावर अत्याचार वाढू लागला तेव्हा मी भारतात आलो.
बलदेव सिंग पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या बारीकोट सीटवरून आमदार झाले होते. सध्या ते भारतातील पंजाबच्या खन्नामध्ये आले आहेत. ते आणि त्यांचा परिवार जीव वाचवून भारतात आले आहेत. त्यांनी इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान यांनी हिंदू-शीख सोडा मुस्लिमांसाठी काही केलेले नाही. जी वस्तू 500 रुपयांना मिळत होती ती आज 5 हजार रुपयांना मिळत आहे. त्यांना त्यांचा नवीन पाकिस्तान मुबारक, तेथे काहीच नाही, असे सिंग म्हणाले.
Baldev Kumar, former MLA of Pakistan PM Imran Khan's Pakistan Tehreek-i-Insaf (PTI) party: Not only minorities but even Muslims are not safe there (Pakistan). We are surviving in Pakistan with lot of difficulties. I request Indian govt to give me asylum here. I will not go back. pic.twitter.com/V3J8TWeuG4
— ANI (@ANI) September 10, 2019
पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदू-शीख लोकांनी आवाज उठवा, निवडणूक लढवा आणि आपल्या लोकांसाठी काम करा. इम्रान खान याने सोबत चोरांना घेतले आहे. त्यांच्या पक्षाकडून लोकांवर अन्याय, अत्याचार केले जात आहेत. इम्रान पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याकडे नेत आहेत. मोदींनी मला आश्रय द्यावा, असे आवाहन सिंग यांनी केले आहे.