हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह विधान, आपने बड्या नेत्याचे केले पक्षातून निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 11:02 AM2020-08-13T11:02:57+5:302020-08-13T11:14:55+5:30
आपचे माजी आमदार जर्नेल सिंग यांनी ११ ऑगस्ट रोजी फेसबूकवर हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर जर्नेल सिंग यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
नवी दिल्ली - हिंदू देवी-देवतांबाबत फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट करणे आपचे बडे नेते आणि माजी आमदार जर्नेल सिंग यांना महागात पडले आहे. जर्नेल सिंग यांच्या फेसबूक पोस्टवरून वाद वाढल्यानंतर आम आदमी पक्षाने त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले आहे. जर्नेल सिंग यांनी राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.
जर्नेल सिंग यांनी ११ ऑगस्ट रोजी फेसबूकवर हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर जर्नेल सिंग यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच त्यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली होती. दरम्यान, आता आपने या प्रकरणाचा तपास होईपर्यंत जर्नेल सिंग यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले आहे.
Jarnail Singh (former MLA, Rajouri Garden) suspended from primary membership of the party over his comments on Hindu goddesses: Aam Aadmi Party #Delhipic.twitter.com/cafMae6SHz
— ANI (@ANI) August 13, 2020
मात्र या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना जर्नेल सिंग यांनी सांगितले की, काल माझा फोन ऑनलाइन क्लाससाठी माझ्या मुलाकडे होता. त्याने एक पोस्ट कॉपी पेस्ट केली. मात्र हा प्रकार लक्षात येताच मी ती पोस्ट डिलीट केली. मी देवाच्या सर्व नावांचा, राम, गोविंद, केशव, सदाशिव सर्वांचा सन्मान करतो आणि गुरू तेगबहादूर यांच्या सिद्धांतावर चालतो, असे म्हटले आहे.
आपचे माजी आमदार जर्नेल सिंग यांनी पत्रकारिताही केली असून, २००९ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री पी. चिदंबवरम यांच्यावर केलेल्या चप्पलफेकीमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. १९८४ मधील शिखविरोधी दंगलीतील कांग्रेसच्या भूमिकेविरोधात जर्नेल सिंग यांनी ही चप्पलफेक केली होती.