हार्वर्ड विद्यापीठाच्या ऑफरच्या नावाखाली NDTVच्या माजी पत्रकार निधी राजदान यांची फसवणूक
By कुणाल गवाणकर | Published: January 15, 2021 08:15 PM2021-01-15T20:15:18+5:302021-01-15T20:17:47+5:30
हार्वर्ड विद्यापीठाची ऑफर आल्यानं राजदान यांनी गेल्या वर्षी दिला नोकरीचा राजीनामा
नवी दिल्ली: हार्वर्ड विद्यापीठातील नोकरीच्या नावाखाली एनडीटीव्हीच्या माजी पत्रकार निधी राजदान यांची फसवणूक झाली आहे. निधी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. मी एका मोठ्या फिशिंग हल्ल्याची बळी ठरले आहे, असं निधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगताना यावर मी पुढे कधीही बोलणार नाही, असंदेखील निधी यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
हार्वर्ड विद्यापीठात एसोसिएट प्रोफेसर म्हणून संधी मिळत असल्यानं निधी राजदान यांनी जून २०२० मध्ये एनडीटीव्हीमधील नोकरीचा राजीनामा दिला. त्या २१ वर्षे एनडीटीव्हीमध्ये कार्यरत होत्या. निधी राजदान यांनी फसवणुकीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. 'सप्टेंबर २०२० मध्ये हार्वर्डमधील अध्यापनकार्य सुरू होईल, असं मला सांगण्यात आलं होतं. त्यानंतर कोरोनामुळे जानेवारी २०२१ पासून वर्ग सुरू होतील, असं सांगितलं गेलं,' अशी माहिती राजदान यांनी दिली आहे.
I have been the victim of a very serious phishing attack. I’m putting this statement out to set the record straight about what I’ve been through. I will not be addressing this issue any further on social media. pic.twitter.com/bttnnlLjuh
— Nidhi Razdan (@Nidhi) January 15, 2021
मला येणाऱ्या मेलमध्ये अनेकदा प्रशासकीय विसंगती आढळून आल्या. कोरोना महामारीचा कहर सुरू असल्यानं मी आधी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर मला विविध प्रकारच्या त्रुटी आढळून येऊ लागले. अनेक आक्षेपार्ह बाबी सापडल्या. त्यानंतर मी ही बाब हार्वर्ड विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. विद्यापीठाकडून पाठवण्यात आलेली माहिती मी त्यांच्यासोबत शेअर केली, असं निधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
I’ve been overwhelmed by the calls & messages of support including the DMs here. I apologise for not writing back immediately. I’m taking a well earned break from social media for a few days & will return refreshed and as good as new. In the mean time keep safe everyone.
— Nidhi Razdan (@Nidhi) January 15, 2021
हार्वर्डच्या अधिकाऱ्यांनी मला आलेले सर्व मेल तपासले. एका पद्धतशीरपणे करण्यात आलेल्या फिशिंग हल्ल्याचा मी बळी ठरल्याचं त्यातून मला समजलं. प्रत्यक्षात मला हार्वर्डकडून एसोशिएट प्रोफेसरपदाची ऑफर देण्यातच आली नव्हती. माझा वैयक्तिक डेटा, डिव्हाईस आणि सोशल मीडिया अकाऊंटचा आधार घेऊन अतिशय पद्धतशीरपणे माझी फसवणूक केली गेली, अशा शब्दांत निधी यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियातून सांगितला आहे.