माजी अधिकाऱ्याकडे ४०० कोटींचे घबाड
By admin | Published: June 11, 2017 04:44 AM2017-06-11T04:44:46+5:302017-06-11T04:44:46+5:30
प्राप्तिकर विभागाच्या गुप्तचर आणि गुन्हेगारी चौकशी शाखेने एका कंपनीची ४०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली आहे. ही कंपनी नागालॅण्डमधील
कोची : प्राप्तिकर विभागाच्या गुप्तचर आणि गुन्हेगारी चौकशी शाखेने एका कंपनीची ४०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली आहे. ही कंपनी नागालॅण्डमधील माजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. के. आर. पिल्लई यांच्या मालकीची असून, त्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदकही मिळालेले आहे हे विशेष.
पिल्लई नागालॅण्डमधील राजकीय नेते आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे मुखवटा म्हणून काम करीत असावेत, असा प्राप्तिकर विभागाला संशय असून, याबाबत पिल्लई यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारी निधी विशेष करून केंद्राकडून राज्याला मिळालेला निधी बेकायदेशीररीत्या वळवून नंतर पिल्लई यांच्यामार्फत तो हस्तांतरित करण्यात आला किंवा काय, याची चौकशी करण्यात येत आहे.
पिल्लई यांची श्रीवळसम ग्रुप ही कंपनी संशयास्पद आर्थिक व्यवहारात गुंतली असल्याचा संशय आल्यानंतर प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी केरळ, कर्नाटक, नागालॅण्ड आणि दिल्ली येथे एकापाठोपाठ धाडी टाकल्या. नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर पिल्लई यांनी त्यांची ५० कोटींची मालमत्ता घोषित केली होती. पिल्लई यांनी घोषित केलेली मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नाहून अधिक असल्याचे आढळून आल्यानंतर प्राप्तिकर विभागाने चौकशी सुरू केली. १९७१ मध्ये
नागालॅण्ड पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झालेले पिल्लई सहा वर्षांपूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदावरून निवृत्त झाले होते.