Manmohan Singh Discharged: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून घरी सोडले; प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 10:07 PM2021-10-31T22:07:16+5:302021-10-31T22:08:49+5:30
Manmohan Singh Discharged: डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांची तब्येत अचानक बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून, सुधारत आहे. त्यामुळे डॉ. मनमोहन सिंग यांना एम्स रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच त्यांना ताप आल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे तातडीने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनमोहनसिंग यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त समजताच देशभरातून त्यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी प्रार्थना करण्यात आल्या. मात्र, अनेक दिवसांच्या उपचारांनंतर मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असून, ती सुधारत असल्यामुळे अखेर रविवारी त्यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
मनमोहन सिंग यांच्या निधनाची अफवा
काही दिवसांपूर्वी डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती खालावल्याची तसेच त्यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र, त्यांची प्रकृती उत्तम असून, कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले होते. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यादरम्यान फोटो काढण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ते माझे आई-वडील आहे, म्युझियममधील प्राणी नाही, या शब्दांत डॉ. मनमोहन सिंग यांची कन्या दमन सिंग यांनी मांडवीय यांच्यावर टीका केली होती.
दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांना १९ एप्रिलला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना २९ एप्रिलला सोडण्यात आले होते. त्यानंतर पाच महिन्यांनी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.