माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन
By Admin | Published: July 27, 2015 08:42 PM2015-07-27T20:42:48+5:302015-07-28T11:22:11+5:30
भारताचे मिसाईल मॅन व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले.
ऑनलाइन लोकमत
शिलाँग, दि. २७ - भारताचे मिसाइल मॅन व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. नेहमी विद्यार्थ्यांमध्ये रमणारे अब्दुल कलाम यांनी शेवटच्या क्षणीही विद्यार्थ्यांसोबतच होते. कलाम यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे.
शिलाँग येथील आयआयएममध्ये सोमवारी एपीजे अब्दुल कलाम यांचे भाषण होते. कलाम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्या आणि मंचावरच कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने शिलाँगमधील बेथनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वरम येथील एका खेड्यात झाला होता. एका नावाड्याच्या घरात जन्मलेले कलाम यांनी अविरत मेहनत घेत विज्ञान क्षेत्रात भारताचा झेंडा रोवला. भारताच्या मिसाइल कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे कलाम हे देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले. राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यावर साधेपणामुळे ते ओळखले जात होते. सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ते ओळखले जायचे. कलाम यांचा प्रवास हा तरुण पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांसह भारत रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.
कलाम यांचे पार्थिव शिलाँगवरुन दिल्लीत आणले जाणार असून रामेश्वरम या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांनी कलाम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.