माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या मोठ्या भावाचं निधन; वयाच्या १०४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 09:24 AM2021-03-08T09:24:02+5:302021-03-08T09:24:37+5:30
अब्दुल कलाम यांच्या मोठ्या भावाचं वृद्धापकाळानं निधन; रामेश्वरममधल्या राहत्या घरी प्राणज्योत मालवली
नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांचे मोठे बंधू मोहम्मद मुथू मीरा लेब्बई मरैकयार (Mohammed Muthu Meera Lebbai Maraikayar) यांचं तामिळनाडूतल्या रामेश्वरममध्ये निधन झालं. मोहम्मद यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते १०४ वर्षांचे होते. वयोवृद्ध असल्यानं मोहम्मद काही आजारांचा सामना करत होते. याशिवाय त्यांच्या एका डोळ्याला संसर्गदेखील झाला होता. काल संध्याकाळी साडे सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
मोहम्मद यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांच्या पत्नीचं आधीच निधन झालं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम आणि द्रमुख अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. मोहम्मद आणि अब्दुल कलाम यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. अब्दुल कलाम यांचे वडील नाविक म्हणून काम करायचे. मासेमारी करणाऱ्यांना होडी भाड्यानं देऊन त्यांची गुजराण व्हायची. कलाम यांचं बालपण अतिशय कष्टाचं आणि संघर्षाचं होतं. पाच भाऊ आणि पाच बहिणी असलेलं कुटुंब चालवण्यासाठी कलाम यांच्या वडिलांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला.