माजी राष्ट्रपती कोविंद स्वखर्चाने साजरे करीत धार्मिक सण-उत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 09:45 AM2022-07-28T09:45:29+5:302022-07-28T09:46:03+5:30
वाद आणि प्रसिद्धीपासून राहिले दूर
शरद गुप्ता
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ काटकसर आणि सेवेसाठी ओळखला जाईल. पूर्ण कार्यकाळात ते वाद आणि प्रसिद्धीपासून दूर राहिले. ते सर्व सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम स्वखर्चाने कुटुंबीयांसमवेत साजरे करायचे. यावर सरकारी पैसे खर्च करू नये, अशी त्यांची धारणा होती. राष्ट्रपती भवन परिसरातील मंदिर, गुरुद्वारा, चर्च आणि मशिदीच्या परिसरातच ते सर्व धार्मिक कार्यक्रम साजरे करायचे. त्यासाठी कोविंद यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गणी द्यायचे. यापूर्वीही सर्व राष्ट्रपती धार्मिक सण सामूहिकपणे साजरे करीत आणि त्याचा खर्च राष्ट्रपती भवन करीत होते.
लिमोझीन खरेदीचा प्रस्ताव स्थगित
कोरोनामुळे त्यांनी काटकसर म्हणून पारंपरिक समारोहादरम्यान वापरण्यासाठी लिमोझीन कार खरेदीचा प्रस्तावही स्थगित केला. राष्ट्रपती भवनात आयोजित सर्व कार्यक्रमांवरील खर्च ते स्वत: पाहत.
पत्नी सविता यांनी मास्क बनविले
कोरोना काळातील लॉकडाऊनदरम्यान कोविंद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गरिबांसाठी भोजनाची व्यवस्था केली, मास्क तयार केले. त्यांनी एक महिन्याचे वेतन पीएम केअर्स फंडला दान केले होते. एक वर्षांपर्यंत ३० टक्के वेतन या फंडसाठी दान केले होते. त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी स्वत: शिलाई यंत्रावर शेकडो मास्क तयार करून गरिबांना मोफत वाटले, तर कुटुंबातील अन्य सदस्यांनी दररोज किमान शंभर लोकांसाठी स्वत: भोजन तयार करून गुरुद्वारा रकाबगंजमार्फत गरिबांना वाटप केले होते.
कुलगुरूंशी सातत्याने संवाद; मीडियापासून अंतर राखले
कुलपती म्हणून सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत त्यांचे बैठकांचे सत्र सुरू केले होते. यात ते कुलगुरूंशी संसाधनाच्या अभावापासून शैक्षणिक दर्जासह सर्व विषयांवर चर्चा करायचे व अभिप्राय केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पाठवायचे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या ६ महिने अगोदर त्यांनी मीडियापासून अंतर राखले होते.