"२०२४ मध्ये देखील भाजपचे सरकार, मी पण लोकसभा लढवणार", ब्रीजभूषण यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 04:51 PM2023-06-11T16:51:40+5:302023-06-11T16:52:11+5:30
brijbhushan sharan singh news : मागील दीड महिन्यापासून भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत.
नवी दिल्ली : मागील दीड महिन्यापासून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. देशातील नामांकित महिला पैलवान २३ एप्रिलपासून सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत होते. तूर्तास सरकारच्या आश्वासनानंतर पैलवानांनी १५ जूनपर्यंत आखाड्याबाहेरील कुस्ती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रीजभूषण यांनी महिला पैलवानांसह महिला प्रशिक्षकांचा लैगिंक छळ केल्याचा गंभीर आरोप कुस्तीपटूंनी केला आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. अशातच ब्रीजभूषण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. वादाच्या भोवऱ्यात असलेल्या सिंह यांनी आगामी लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय २०२४ मध्ये देखील भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
२०२४ मध्ये देखील भाजपचे सरकार - सिंह
उत्तर प्रदेशातील गोंडा येथील संयुक्त मोर्चा संमेलनात भाजपचे खासदार आणि माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटले, "२०२४ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल. उत्तर प्रदेशात भाजप सर्व जागा जिंकेल. तसेच मी कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे."
#WATCH | At the Sanyukt Morcha Sammelan in Gonda, Uttar Pradesh, BJP MP and former WFI chief Brij Bhushan Sharan Singh says, "In 2024, BJP will form the Government with absolute majority. BJP will all seats in Uttar Pradesh."
— ANI (@ANI) June 11, 2023
"I will contest the election from Kaiserganj Lok… pic.twitter.com/b3Dqyy73OB
पैलवानांसोबतच्या बैठकीनंतर अनुराग ठाकूर यांनी म्हटले...
पैलवानांसोबतच्या बैठकीनंतर अनुराग ठाकूर यांनी म्हटले की, संवेदनशील विषयावर कुस्तीपटूंशी सकारात्मक चर्चा झाली आहे. या बैठकीत भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण करून दिल्ली पोलिसांना १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच कुस्ती महासंघाची निवडणूक ३० जूनपर्यंत होईल. जोपर्यंत निवडणूक होत नाही, तोपर्यंत आयोगाच्या समितीकडून दोन जणांची नावे प्रस्तावित करण्यात आली आहेत. महिला कुस्तीपटूंना आवश्यकतेनुसार सुरक्षा मिळेल याची आम्ही काळजी घेऊ.