माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात केले दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 02:57 PM2020-08-10T14:57:39+5:302020-08-10T15:13:32+5:30
गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व त्यांनी स्वतःला वेगळे करावे, असे मी आवाहन त्यांनी केलं आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी दुपारी ट्विट करून ही माहिती दिली. प्रणव मुखर्जी यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, रुग्णालयात तपासणीसाठी गेलो असता मला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व त्यांनी स्वतःला वेगळे करावे, असे आवाहन त्यांनी केलं आहे.
प्रणव मुखर्जी यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांच्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी शुभेच्छा दिल्यात. त्यांच्याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करून प्रणव मुखर्जी यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही ट्विट करत त्यांना लवकरात लवकर बरे व्हा, अशी प्रार्थना केली आहे.
प्रणव मुखर्जी यांचे वय 84 वर्षे आहे, अशा परिस्थितीत वाढत्या वयामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॉंग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी हे 2012 ते 2017 दरम्यान देशाचे राष्ट्रपती राहिले आहेत. 2019मध्ये केंद्र सरकारने प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. देशात कोरोनाचे संकट अतिशय वेगाने पसरत आहे आणि आतापर्यंत बर्याच व्हीव्हीआयपी देखील कोरोनाला बळी पडले आहेत. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं आढळले होते, त्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याव्यतिरिक्त अर्जुन मेघवाल आणि इतर काही केंद्रीय मंत्र्यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याशिवाय अनेक राज्य सरकारांच्या मंत्र्यांनाही विषाणूची लागण झाली आहे. नुकतेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. बराच काळ रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.