माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंचत्वात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 03:51 AM2020-09-02T03:51:14+5:302020-09-02T06:43:12+5:30
सोमवारी प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पीएम मोदी, अमित शाह, लालकृष्ण आडवाणी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला.
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर मंगळवारी लोधी स्मशान घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना १0 आॅगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्यातील रक्ताच्या गाठी काढण्यासाठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. ते व्हेण्टिलेटरवर होते. प्रणवदा यांना कोरोना संसर्गदेखील झाला होता. यामुळे एसओपीअंतर्गत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र अभिजीत बॅनर्जी आणि कुटुंबातील सदस्यदेखील पीपीई किट घालून उपस्थित होते.
तत्पूर्वी, १0 राजाजी मार्ग येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली.केंद्र सरकारने त्यांच्या सन्मानार्थ ३१ आॅगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. यानंतर पश्चिम बंगाल सरकारनेही दुखवटा जाहीर केला आहे. सोमवारी प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पीएम मोदी, अमित शाह, लालकृष्ण आडवाणी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला.
प्रणव मुखर्जी यांनी २०१२ ते २०१७ या काळात देशाचे राष्ट्रपतीपद सांभाळले होते. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये वित्त, संरक्षण, परराष्ट्र यासह विविध महत्त्वपूर्ण पदांवर काम केले होते. तसेच लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. त्याबरोबरच विविध संसदीय समित्यांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली होती.