विश्व शांती केंद्र अस्वस्थ जगाला अहिंसेचा मार्ग दाखवेल; माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 08:38 IST2025-03-03T08:37:45+5:302025-03-03T08:38:49+5:30
अहिंसा विश्व भारतीद्वारे गुरुग्राम येथे बनविलेल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले.

विश्व शांती केंद्र अस्वस्थ जगाला अहिंसेचा मार्ग दाखवेल; माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : युद्ध, दहशतवाद, ग्लोबल वाॅर्मिंग आणि असमानता यांसारख्या समस्या संपूर्ण जगाला भेडसावत असताना जगात अहिंसा आणि शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी विश्व शांती केंद्र महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचा विश्वास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.
अहिंसा विश्व भारतीद्वारे गुरुग्राम येथे बनविलेल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर, गोविंददेव गिरि, मुरारी बापू आदी मान्यवर उपस्थित होते.
पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया म्हणाले की, राजस्थानमध्ये जन्मलेले आचार्य लोकेशजी यांना अमेरिकन राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी विश्व शांती केंद्राच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक सहिष्णुता आणि परस्पर सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल, असे सांगितले. हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी म्हणाले की, हरयाणाच्या या पवित्र भूमीवर विश्व शांती केंद्र स्थापन होणे हा केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी गर्वाचा क्षण आहे.
श्री श्री रविशंकर म्हणाले की, ‘जहाँ हरी का आना होता हैं वह हरयाणा हैं’. अशा पवित्र भूमीवर विश्व शांती केंद्र अस्तित्वात येणे स्वतःमध्येच एक खूप मोठा संदेश आहे. भाईश्री रमेशभाई ओझा म्हणाले की, शांतता केंद्राची स्थापना हा समाजाची दिशा आणि स्थिती बदलण्याचा एक अद्भूत प्रयत्न आहे.
या परिषदेला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, स्वामी रामदेव, गोविंददेव गिरी, बौद्ध भिक्षू संघसेना, इमाम उमर अहमद इलियासी, स्वामी धर्मदेव, स्वामी दीपंकर, परमजीत सिंह चांडोक, स्वामी अभय दास जी, पुंडरिक गोस्वामी आणि देवी चित्रलेखा यांनीही संबोधित केले.
समाजाची दिशा आणि स्थिती बदलण्यास हातभार
जैन आचार्य लोकेश मुनीजी म्हणाले की, जागतिक शांती केंद्राचा उद्घाटन समारंभ हा अध्यात्म आणि समाजसेवेचा एक महाकुंभ आहे. येथून जागतिक शांती आणि सद्भावनेचा संदेश प्रसारित करेल. विश्व शांती केंद्राची स्थापना समाजाची दिशा, स्थिती बदलण्यास हातभार लावेल.
जगभरात शांती, बंधुभावाचा संदेश जाईल : डॉ. दर्डा
लोकमत वृत्तपत्र समुहाचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा म्हणाले की, या विश्व शांती केंद्रातून जगभरात शांती आणि बंधुभावाचा संदेश प्रसारित होणार आहे. अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक जैन आचार्य लोकेश मुनीजी श्रेष्ठतम जैन परंपरेची ध्वजा घेऊन अहिंसेचा संदेश देण्यासाठी निघाले आहेत. सिंगापूर येथे आयोजित ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये आचार्यश्री आले असताना त्यांची जैन परंपरेला समर्पित अशी जीवनशैली बघायला मिळाली. ते हॉटेलमध्ये आले होते. मात्र, हॉटेलचे जेवण केले नाही. तेथील पाणी सुद्धा प्यायले नाहीत.
एका आठवणीचा उल्लेख करताना डॉ. दर्डा म्हणाले की, एकदा आचार्यश्री तुलसी यांना एल. एम. सिंघवी म्हणाले होते की, आचार्य यांना थोडे मोकळे करून त्यांना अशा कार्यात लावायला हवे जे सर्व बंधनातून मुक्त असेल आणि शांती तसेच बंधूबावाचा प्रचार प्रसार करतील’.
महत्वाचे म्हणजे, आचार्य लोकेश मुनीजी यांनी कॅनडाच्या संसदेत बोलताना पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनाही सुनावले होते. त्यावेळचे भाषण ऐकून माझे डोळे भरून आले होते. त्यावेळेस सर्वत्र भीतीचे वातावरण होते. मात्र आचार्य लोकेश मुनीजी यांनी आपला संदेश एवढ्या प्रेमाने मांडला जे सर्वासाठी अनुकरणीय करण्यासारखे होते.
डॉ. दर्डा म्हणाले की, बिहारचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांचे ४० वर्षांपासून संबंध आहेत. ते राजकारण, कायदा अशा विविध विषयावर बोलतात. मात्र जेव्हा ते भगवान महावीर यांच्यावर बोलतात ते भल्याभल्याना आश्चर्यचकित करणारे असते. यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्या खासदार होते तेव्हा विविध समित्यामध्ये सोबत काम केले होते, असेही त्यांनी सांगितले.