Lokmat Parliamentary Award : 'लोकमत संसदीय पुरस्कार' सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 05:34 PM2023-03-11T17:34:02+5:302023-03-11T17:39:01+5:30
Lokmat Parliamentary Award : येत्या १४ मार्चला होणाऱ्या 'लोकमत' संसदीय पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्हसुद्धा होणार आहे.
नवी दिल्ली : 'लोकमत' संसदीय पुरस्कार २०२२ वितरण सोहळा येत्या १४ मार्च २०२३ रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा हा चौथा पुरस्कार वितरण सोहळा आहे. या पुरस्कार सोहळ्याला देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 'लोकमत' संसदीय पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. दरम्यान, संसदीय लोकशाहीमध्ये अतुलनीय योगदान दिल्याबद्दल संसदेच्या सदस्यांना हा पुरस्कार आठ विविध श्रेणींमध्ये (यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांचा समावेश) देण्यात येणार आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिजू जनता दलाचे भर्तुहरी मेहताब, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ'ब्रायन, भारतीय जनता पक्षाचे नेते तेजस्वी सूर्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे नेते लॉकेट चॅटर्जी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते डॉ. कुमार झा यांची 'लोकमत' संसदीय पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
भारतीय लोकशाहीवर होणार चर्चा
येत्या १४ मार्चला होणाऱ्या 'लोकमत' संसदीय पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्हसुद्धा होणार आहे. 'इंडियन डेमोक्रसी : हाऊ टू क्लोज मॅच्युरिटी' या विषयावर विविध क्षेत्रातील महनीय व्यक्ती आपले विचार मांडणार आहेत.
सर्व सदस्यांच्या कामगिरीचा केला अभ्यास
ज्युरी बोर्डाने विजेत्यांची निवड करण्यासाठी सर्व सदस्यांच्या २०२० आणि २०२१ या वर्षातील संसदीय योगदानाचा अभ्यास केला. सदस्य वर्षभर करत असलेली सकारात्मक कामे लक्षात घेऊन त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी २०१७ साली लोकमत संसदीय पुरस्कारांची संकल्पना अस्तित्वात आली. त्यानुसार २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये उत्कृष्ट खासदारांना माननीय उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोना साथीमुळे गेली दोन वर्षे पुरस्कार सोहळा होऊ शकला नाही.
याआधी मनमोहन सिंग, अडवाणी आदी सन्मानित
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शरद पवार, मुलायम सिंग, शरद यादव, सीताराम येचुरी, जया बच्चन, सुप्रिया सुळे, निशिकांत दुबे, हेमा मालिनी, भारती पवार, सुष्मिता देव, मीनाक्षी लेखी, डॉ. रजनी पाटील यांना याआधी या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
'या' सदस्यांची पुरस्कारांसाठी निवड
जीवनगौरव
मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभा
भर्तुहरी मेहताब, बिजू जनता दल
सर्वोत्कृष्ट संसदपटू
असदुद्दीन ओवैसी, एआयएमआयएम
डेरेक ओ'ब्रायन, तृणमूल काँग्रेस
सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू
वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस
लॉकेट चॅटर्जी, भाजप
सर्वोत्कृष्ट नवोदित संसदपटू
तेजस्वी सूर्या, भाजप
प्रा. मनोजकुमार झा, आरजेडी
आठ वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार
सर्वांत विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित लोकमत संसदीय पुरस्कार दरवर्षी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये (४ लोकसभेतून आणि ४ राज्यसभेतून) उत्कृष्ट संसद सदस्यांना त्यांच्या योगदानासाठी दिले जातात.