Manmohan Singh: देशाने अर्थशास्त्रातील सिंह गमावला! भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 22:38 IST2024-12-26T22:38:00+5:302024-12-26T22:38:50+5:30

भारतात अर्थक्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या डॉ. सिंग यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे.

Former Prime Minister of India Dr Manmohan Singh passes away at the age of 92 | Manmohan Singh: देशाने अर्थशास्त्रातील सिंह गमावला! भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश

Manmohan Singh: देशाने अर्थशास्त्रातील सिंह गमावला! भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश

Manmohan Singh: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कालावधीत भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. भारतात अर्थक्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या डॉ. सिंग यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे.

२००४ साली मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना ‘ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ म्हटले गेले. परंतु एरवी गप्प राहणाऱ्या डॉ. सिंग यांनी ते एक सर्वोत्तम पंतप्रधान होते याची नोंद इतिहासात केली. मनमोहन सिंग यांनी केवळ देशाच्या आर्थिक उन्नतीवर लक्ष केंद्रित केले  नाही, तर त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक सुरक्षेच्या अनेक योजना कालजयी ठरल्या. देशाला विकासाच्या रस्त्यावर पुढे घेऊन जाईल, असे महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षण, हे ते जाणून होते,  म्हणून त्यांनी सहा ते चौदा या वयोगटातल्या प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मौलिक अधिकार मिळवून दिला. सर्व काही पारदर्शक असेल तर लोकशाही मजबूत होईल, असा त्यांचा विश्वास होता; म्हणून त्यांच्या सरकारने सामान्य माणसाला माहितीचा अधिकार दिला.

कोणी भूकबळी ठरू नये यासाठी खाद्यसुरक्षा कायदा त्यांनी केला. भूसंपादन कायदा तसेच वनअधिकार कायदा ही सुद्धा त्यांच्या कार्यकाळाची देणगी आहे. प्रत्येक ग्रामीण परिवाराला वर्षातून कमीत कमी १०० दिवस काम देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम त्यांच्या सरकारने आणला. त्यालाच आता मनरेगा या नावाने ओळखले जाते. जगातली ही  अनोखी अशी रोजगार योजना आहे. गर्भावस्थेपासून माता आणि बाळाची काळजी घेणारी इंदिरा गांधी मातृत्व योजना त्यांनी आणली. आर्थिक मदत आणि अन्य सामुग्रीची व्यवस्था त्यातून केली गेली. 

Web Title: Former Prime Minister of India Dr Manmohan Singh passes away at the age of 92

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.