...म्हणून मी ट्विटरवर नाही- रघुराम राजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 07:43 PM2018-03-23T19:43:53+5:302018-03-23T19:43:53+5:30
सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आर्थिक धोरणांचे विश्लेषण करण्यासाठी ते प्रसिद्ध होते.
कोची: सध्याच्या घडीला ट्विटर अकाऊंट असणे, हे एकप्रकारचे स्टेटस सिम्बॉल मानले जाते. अनेक कंपन्या आणि प्रसिद्ध व्यक्ती महत्त्वाच्या घोषणांसाठी ट्विटरचे व्यासपीठ वापरतात. मात्र, काही मोजक्या व्यक्ती याला अपवाद आहेत, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हेदेखील त्यांच्यापैकी एक. सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आर्थिक धोरणांचे विश्लेषण करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर अकाऊंटसच्या फॉलोअर्सच्या संख्येत मोठी भर पडली होती. मात्र, असे असूनही स्वत: रघुराम राजन यांचे ट्विटर अंकाऊट नसल्याबद्दल अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. नुकत्याच कोचीत झालेल्या एका कार्यक्रमात रघुराम राजन यामागील कारण स्पष्ट केले.
त्यांनी म्हटले की, माझ्याकडे या सगळ्यासाठी फारसा वेळ नसतो. एकदा का तुम्ही ट्विटर वा तत्सम सोशल मीडियाचा वापर करायचे ठरवले, तर तुम्हाला त्याठिकाणी सातत्याने वेळ द्यावा लागतो. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ट्विटरवर पटकन व्यक्त होण्यासाठी जे कौशल्य लागते, ते माझ्याकडे नाही. मी अवघ्या 20 ते 30 सेकंदांमध्ये 140 शब्द लिहू शकत नाही, असे राजन यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी रघुराम राजन राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. आम आदमी पक्षाकडून त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती. परंतु, राजन स्वत:हूनच ही ऑफर नाकारल्याचे स्पष्ट केले होते. मी जेव्हा आरबीआयमध्ये होतो, त्यावेळी लोकांना वाटायचं की मी आयएमएफमध्ये परत जावं. माझ्याजवळ एक चांगला मेंदू आहे, जो दिवसातील अनेक तास काम करतो. ही एक नोकरी आहे आणि ती मला आवडते. राजकारणात येण्याला माझा नकार आहे. राजकारणात जाण्यास पत्नीने स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवल्याचेही राजन यांनी सांगितले होते.