रघुराम राजन विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 09:11 AM2018-05-30T09:11:28+5:302018-05-30T09:11:28+5:30
शिकागोमधील वर्ल्ड हिंदू काँग्रेससाठी राजन यांना आमंत्रण
मुंबई: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं एका कार्यक्रमाचं आमंत्रण दिलंय. या आमंत्रणाची जोरदार चर्चा असतानाच आता विश्व हिंदू परिषदेनं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर यांना वर्ल्ड हिंदू काँग्रेस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलंय. यंदा शिकागोत वर्ल्ड हिंदू काँग्रेसचं आयोजन करण्यात येणाराय. यासाठी राजन यांना आमंत्रित करण्यात आलंय.
चार वर्षातून एकदा आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत, तिबेटी धर्मगुरु दलाई लामा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गियर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जगभरातील हिंदूंना सन्मान मिळावा, त्यांची प्रतिष्ठा वाढावी, या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणाराय. शिकागोमध्ये स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी ऐतिहासिक भाषण केलं होतं. या भाषणाला 125 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान वर्ल्ड हिंदू काँग्रेसचं आयोजन करण्यात येणाराय.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर असलेल्या रघुराम राजन यांनी वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये सहभागी होऊन त्यांचे विचार मांडावेत, असं आयोजकांना वाटतं. त्यामुळेच त्यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलंय. मात्र या कार्यक्रमातील राजन यांचा सहभाग अनिश्चित मानला जातोय. कार्यक्रमात सहभागी होणार की नाही, याबद्दल राजन यांनी आयोजकांना कोणतीही माहिती दिलेली नाही. राजन आमंत्रण स्विकारतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय.